नवी दिल्ली: यंदा सणासुदीच्या हंगामात वाहनविक्रीत तब्बल २२ टक्क्यांची घसरण झाली असून विक्रीत १० वर्षांतील नीचांक झाला आहे. भारतात नवरात्र ते दिवाळी या काळास सणासुदीचा हंगाम समजले जाते. या काळात देशभर जोरदार खरेदी होते. वाहन क्षेत्रासाठी तर हा पर्वणीचा काळ असतो. यंदा मात्र बाजारात निराशाजनक चित्र पाहायला मिळाले.
वाहन क्षेत्रासाठी हा १० वर्षांतील सर्वाधिक वाईट हंगाम राहिला. नवरात्र ते दिवाळी या ३० दिवसांच्या काळात प्रवासी वाहनांची विक्री एक तृतीयांशने घटली आहे. गेल्या वर्षी ४ लाख ५५ हजार प्रवासी वाहने विकली गेली असताना यंदा केवळ ३ लाख वाहनांची विक्री झाली. सरकारच्या वाहन पोर्टलनुसार, यंदा वाहन उत्पादकांनी २,३८,७७६ वाहनांची विक्री केली.
गेल्या वर्षी ३,०५,९१६ वाहनांची विक्री झाली होती. याचाच अर्थ यंदा विक्री २२ टक्क्यांनी घटली आहे. दुचाकी वाहनांच्या विक्रीत ११ टक्के, तर ट्रॅक्टर विक्रीत १३ टक्के घसरण झाली आहे. उत्तरप्रदेशात वाहन विक्रीत ३.५ टक्के वाढ झाली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळमध्ये ६ ते ९ टक्क्यांची घसरण झाली आहे.
बिहार, दिल्ली, गुजरात, पंजाब, राजस्थान आणि हरियाणा या राज्यांत वाहन विक्री १५ ते २२ टक्क्यांनी घसरली आहे. सूत्रांनी सांगितले की, वाहन पोर्टल देशातील ८५ टक्के विभागीय परिवहन कार्यालयातील वाहन नोंदणीवर आधारित डाटा तयार करते. हा डाटा ७ ते १५ दिवसांनी उशिरा येतो. दिवाळीतील संपूर्ण आकडेवारी येण्यासाठी आणखी काही दिवस लागू शकतात.