इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आल्याने आता आपल्यासाठी पेट्रोलवरील स्कूटर घ्यायची कि इलेक्ट्रिक स्कूटर घ्यायची, असे पर्याय उपलब्ध झालेले आहेत. दरम्यान, दररोज ८० किमी प्रवास करायचा असेल तर इलेक्ट्रिक स्कूटर उपयुक्त ठरेल की पेट्रोलवरची, याला तज्ज्ञांनी उत्तर दिलं आहे.
सध्या मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांना असलेली मागणी वेगाने वाढली आहे. आधी कंपन्या महिन्याला ८ ते १० हजार इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री व्हायची मात्र आता ओलासह अनेक कंपन्या ह्या दरमहा ३०-३० हजार इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री करत आहेत.
तुम्हाला जर एक इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायची असेल, तर आधी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे. पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या घरात इलेक्ट्रिक स्कूटर चार्ज करण्याची सुविधा असली पाहिजे. कारण सार्वजनिक चार्जिंगच्या ठिकाणी तुम्हाला ही स्कूटर कदाचित चार्ज करता येणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे इलेक्ट्रिक स्कूटर तुमच्या दैनंदिन गरजा भागवण्यास सक्षम आहे का, याचाही विचार केला पाहिजे.
सध्या मार्केटमध्ये ज्या इलेक्ट्रिक स्कूटर आहेत, त्यातील बहुतांश स्कूटर ह्या सुमारे १०० किमी रेंजपर्यंत जातात. अशा परिस्थितीत जर तुमचा दररोजचा प्रवास हा ८० किमी असेल तर तुमच्यासाठी इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करणं थोडंसं अडचणीचं ठरू शकतं. कारण तुम्ही दररोज केवळ ८० किमीच स्कूटर चालवणार असं नाही. अनेकदा तुम्हाला थोडा अधिकचा प्रवासही करावा लागू शकतो.
मात्र जर तुमचं दररोजचं रनिंग हे सुमारे ६० किमी असेल तर इलेक्ट्रिक स्कूटरबाबत तुम्ही विचार करू शकता. या स्कूटरची किमान रनिंग कॉस्ट तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. मात्र मार्केटमध्ये जर इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायला गेलात तर चायनिज ब्रँड्सऐवजी विश्वसनीय ब्रँड्सच्या स्कूटर खरेदी करा.