कारच्या बॅटरीचे आयुष्य वाढविण्यासाठी काय कराल ?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 03:16 PM2018-08-14T15:16:33+5:302018-08-14T18:48:19+5:30
बाहेर कुठेतरी जायचे असेल आणि नेमकी त्याचवेळी बॅटरी पार उतरली असेल तर काय? होणार की नाही खोळंबा...
कोणत्याही वाहनासाठी बॅटरी हा खूप महत्वाचा भाग आहे. जर बॅटरी खराब झाली असेल तर वाहन चालू करणे कठीण जाते. शहरांमध्ये कार सारख्या उभ्या असल्याने बऱ्याचदा बॅटरी उतरल्याचा अनुभव येतो. जर आपल्याला बाहेर कुठेतरी जायचे असेल आणि नेमकी त्याचवेळी बॅटरी पार उतरली असेल तर काय? होणार की नाही खोळंबा... चला तर मग बॅटरीची काळजी कशी घ्यायची यावर एक नजर टाकू...
आजच्या वाहनांमध्ये पाणी नसलेली बॅटरी वापरली जाते. पुर्वी प्रकिया केलेले पाणी बॅटरीमध्ये टाकावे लागत होते. तसेच ते वेळोवेळी न तपासल्यास बॅटरीची चार्ज होण्याची शक्ती कमी होत होती. आता कंपन्यांनी 'नो मेन्टेनन्स' वाली बॅटरी बाजारात आणली आहे. यामध्ये पाणी टाकावे लागत नाही. एकदा खराब झाली की बदलावी लागते. बॅटरी का खराब होते? त्याची कारणे.
बॅटरी टर्मिनलची तपासणी करावी : बॅटरी ही कारसाठी उर्जेचा स्त्रोत आहे. यामुळे आठवड्यातून एकदातरी बॅटरी तपासावी. याचबरोबर महिन्यातून एकदातरी बॅटरीच्या टर्मिनलवर जमा झालेले अॅसिड साफ करावे. बॅटरी मेन्टेनन्स फ्री नसेल तर नियमित पाण्याची पातळी तपासावी.
टर्मिनलला ग्रीस नको : बऱ्याचदा बॅटरीच्या टर्मिनलला लोक ग्रीस लावतात. परंतू, हे ग्रीस बॅटरीला आणखी खराब करते. यामुळे ग्रीसऐवजी पेट्रोलियम जेली किंवा वॅसलीन लावावे. परंतू त्याला वेळोवेळी साफ करत रहावे. अन्यथा त्याला धुळ चिकटू शकते.
इंजिनची देखभाल : बॅटरीची मुळ उपयुक्तता इंजिन चालू करण्यासाठी आहे. त्यामुळे इंजिनची देखभाल नीट केल्यास बॅटरीवर ताण येत नाही. इंजिन सुरु करण्यासाठी मोठी उर्जा लागते. तसेच इंजिन तापल्यास त्याचा बॅटरीवर परिणाम जाणवतो. त्यातील पाणी सुकते. यामुळे बॅटरी जादा ऑक्सीडाइज्ड होते.
कार चालवण्याची सवय : कार चालविण्याची सवयही बॅटरीचे आयुष्यमान ठरविते. रॅश ड्रायव्हिंग केल्याने त्याचा थेट परिणाम बॅटरीवर होतो. यासाठी नेहमी सावकाश कार चालवावी.
बॅटरी बदलण्याची वेळ : साधारणता बॅटरीचे आयुष्य तीन ते पाच वर्षांचे असते. काही कंपन्या तर पाच वर्षांची वॉरंटी देतात. परंतू, बॅटरी 3 ते 4 वर्षांत खराब व्हायला सुरु होते. शेवटपर्यंत चालवायची म्हटल्यास त्याचा इतर पार्टवर परिणाम होतो. यामुळे 3-4 वर्षांत बॅटरी बदलावी.