मलेशियाच्या बॅडमिंटनपटूंवर २० आणि १५ वर्षांची बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 04:41 AM2018-05-03T04:41:20+5:302018-05-03T04:41:20+5:30
मलेशियातीन दोन बॅडमिंटनपटूंना भ्रष्टाचार आणि मॅच फिक्सिंगमध्ये दोषी धरून क्रमश: २० आणि १५ वर्षांची बंदी लावण्यात आली आहे. विश्व बॅडमिंटन महासंघाने
क्वालालम्पूर : मलेशियातीन दोन बॅडमिंटनपटूंना भ्रष्टाचार आणि मॅच फिक्सिंगमध्ये दोषी धरून क्रमश: २० आणि १५ वर्षांची बंदी लावण्यात आली आहे.
विश्व बॅडमिंटन महासंघाने (बीडब्ल्यूएफ) माजी विश्वविजेता २५ वर्षांचा जुल्फादली जुल्फीफली याला २० वर्षांची आणि ३१ वर्षांचा तान चून सियांग याला १५ वर्षांची शिक्षा तसेच १५ हजार डॉलरचा दंड सुनावला. हे दोघेही सट्टेबाजी, जुगार तसेच सामन्यांचा निकाल फिक्स करण्यात दोषी आढळले. बीडब्ल्यूएफच्या पॅनलने फेब्रुवारीत सिंगापूर येथे प्रकरणाची सुनावणी केली. त्यात दोन्ही खेळाडू २०१३ च्या अनेक महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये भ्रष्टाचारात अडकल्याचे आढळले. जुल्फादलीने एकूण चार सामने फिक्स केले होते.
मलेशियाच्या बॅडमिंटन महासंघाचे अध्यक्ष नोर्जा जकारिया म्हणाले,‘मलेशियन बॅडमिंटनसाठी ही दु:खद आणि ठेच पोहोचविणारी बातमी आहे. आमच्या हृदयात असलेल्या खेळावर फिक्सिंगचे डाग लागले.’ दोन्ही खेळाडूंवरील बंदी २१ जानेवारीपासून झाली आहे. तान चून २०१० च्या थॉमस चषक स्पर्धेत मलेशिया संघात होता. जुल्फादली २०११ मध्ये डेन्मार्कचा सध्याचा विश्वविजेता व्हिक्टर एक्सेलसन याला नमवून ज्युनियर विश्वविजेता बनला होता. (वृत्तसंस्था)