आशिया चॅम्पियनशीप : सायना, प्रणॉय यांना कांस्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 05:55 AM2018-04-29T05:55:45+5:302018-04-29T05:55:45+5:30
भारतीय शटलर सायना नेहवाल आणि एच.एस. प्रणॉय यांना आज येथे आशिया चॅम्पियनशीप बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला.
वुहान, चीन : भारतीय शटलर सायना नेहवाल आणि एच.एस. प्रणॉय यांना आज येथे आशिया चॅम्पियनशीप बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. भारतीय खेळाडूंना कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. या महिन्याच्या सुरुवातीला राष्ट्रकुल स्पर्धेत दुसरे सुवर्ण पदक जिंकणारी सायना नेहवाल हिने जगातील दुसऱ्या क्रमांकाची खेळाडू आणि गतविजेती ताय जु यिंग हिच्याकडून २५-२७, १९-२१ असा पराभव स्विकारला. जगातील दहाव्या क्रमांकाचा खेळाडू प्रणॉय याला चीनच्या आॅलिम्पिक चॅम्पियन चेन लोंग याने १६-२१,१८-२१ असे पराभूत केले.
दुसºया गेममध्ये सायना आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूच्या चुकांचा फायदा घेत ४-३ अशी आघाडीवर होती. मात्र त्यानंतर यिंग हिने आघाडी घेतली. अखेरीस दोन्ही खेळाडू १९-१९ अशा बरोबरीवर होत्या. मात्र सायनाच्या चुकीचा फायदा घेत यिंग हिने सामन्यात विजय मिळवला.
प्रणॉय याला अनियमित खेळाचा फटका बसला. त्याने सुरुवातीलाच ५ -२ अशी आघाडी घेतली. मात्र ब्रेकपर्यंत चेन लोंग याने ११ -१० अशी आघाडी घेतली आणि अखेरपर्यंत आपला दबदबा कायम ठेवला.
प्रणॉय याने दोन गेमपॉईंट वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र पहिला गेम तो वाचवु शकला नाही. दुसºया गेममध्ये चेन लोंगने सोपा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.(वृत्तसंस्था)
सायना आणि ताय जु यिंग यांच्यातील १६ सामन्यात सायनाचा हा सलग आठवा आणि सत्रातील तिसरा पराभव आहे. या वर्षी इंडोनेशिया ओपनच्या अंतिम फेरीत आणि आॅल इंग्लंड चॅम्पियनशीपमध्ये सायना पराभूत झाली होती. ताय जु यिंग हिने ४ -१ अशा आघाडीने सुरुवात केली. ती ब्रेकपर्यंत ११-६ अशी आघाडीवर होती. मात्र त्यानंतर सायना हिने १५-१५ अशी बरोबरी साधली. त्यानंतर सायना हिने १८-१७ अशी आघाडी घेतली. मात्र त्यानंतर यिंग हिने २०-२० अशी बरोबरी साधली आणि नंतर गेम जिंकला.