पी. व्ही. सिंधू.... भारतीय क्रीडा विश्वात फुलराणी सायना नेहवालनंतर मानाने घेतलं जाणर नाव... चिनी खेळाडूंची मक्तेदारी मोडण्याची शिकवण सायनाने भारतीयांना दिली आणि त्यावर सिंधूने जेतेपदांचा डोलारा उभा केला. सिंधूने आशियाई स्पर्धेतही सायनाच्या एक पाऊल पुढ टाकले आहे. आशियाई स्पर्धेत महिला एकेरीत आणि 1982 नंतर एकेरीतील पहिले पदक जिंकण्याचा मान सायनाने पटकावला... उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागल्याने सायनाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. मात्र, सिंधूने त्याही पलिकडे झेप घेत अंतिम फेरीत प्रवेश केला. भारतीय महिला बॅडमिंटनपटूला प्रथमच महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश करता आला.
सिंधूसाठी सोनेरी इतिहास आता एका विजयावर आहे. मंगळवारी तिला जेतेपदासाठी चायनीज तैपेईच्या ताय त्झुयिंगचा सामना करावा लागणार आहे. आशियाई स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूंना एकदाही कांस्यपदकाची वेस ओलांडता आलेली नाही. भारताने 2014पर्यंत 8 कांस्यपदक जिंकली आहेत आणि त्यात 1982 साली सय्यद मोदी यांनी पटकावलेले एकेरीतील एकमेव पदक आहे. उर्वरीत 7 पदकं ही दुहेरी प्रकारात जिंकलेली आहेत. त्यामुळे यंदाच्या आशियाई स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी एकेरीत दोन पदकं निश्चित करून इतिहास घडवला.
त्यात सिंधूचे विशेष कौतुक करायला हवे. तिने सातत्यपूर्ण खेळ करताना 2018 हे वर्ष खऱ्या अर्थाने गाजवले. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत दोन रौप्य आणि दोन कांस्य अशी चार पदकं तिच्या नावावर आहेत. अशी कामगिरी करणारी ती एकमेव भारतीय महिला बॅडमिंटनपटू आहे. त्याशिवाय ऑलिम्पिक स्पर्धेचे रौप्यपदक नावावर असलेली ती एकमेव भारतीय बॅडमिंटनपटू आहे. त्याला आशियाई स्पर्धेतील यशानं चार चाँद लावले... आशियाई स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारीही ती पहिलीच भारतीय आहे. त्यामुळे तिच्याकडून अपेक्षा उंचावल्या आहेत. तिने अंतिम फेरीतील नर्व्हसनेसवर मात केल्यास सुवर्ण इतिहास लिहीण्यापासून तिला कोणीच रोखू शकत नाही आणि भारतीयांचीही तिच इच्छा आहे.