Asian Games 2018 : बॅडमिंटनला सुवर्ण झळाळी देण्याची हीच संधी!

By स्वदेश घाणेकर | Published: August 15, 2018 05:11 AM2018-08-15T05:11:59+5:302018-08-15T05:12:20+5:30

आगामी आशियाई स्पर्धेत भारतीय बॅडमिंटन संघ सर्वोत्तम कामगिरी करताना पदकांची लयलूट करेल, मुख्य प्रशिक्षक पुलेल्ला गोपिचंद यांनी व्यक्त केलेला विश्वास सार्थ ठरो...

Asian Games 2018 : This chance to give badminton a golden glow! | Asian Games 2018 : बॅडमिंटनला सुवर्ण झळाळी देण्याची हीच संधी!

Asian Games 2018 : बॅडमिंटनला सुवर्ण झळाळी देण्याची हीच संधी!

googlenewsNext

आगामी आशियाई स्पर्धेत भारतीय बॅडमिंटन संघ सर्वोत्तम कामगिरी करताना पदकांची लयलूट करेल, मुख्य प्रशिक्षक पुलेल्ला गोपिचंद यांनी व्यक्त केलेला विश्वास सार्थ ठरो... १८ आॅगस्टपासून भारतीय संघ आशियाई स्पर्धेतील पदकांची मोहीम फत्ते करण्यासाठी स्वत:ला झोकून देणार आहेत. यंदाच्या स्पर्धेत विशेष लक्ष असेल ते भारतीय बॅडमिंटनपटूंवर आणि त्याला कारणही तसेच आहे. मागील काही वर्षांत भारताच्या बॅडमिंटनपटूंनी विविध आंतरराष्ट्रीय, जागतिक स्पर्धेत वर्चस्व गाजवले आहे. त्यात सायना नेहवाल, पी.व्ही. सिंधू, किदाम्बी श्रीकांत, अजय जयराम, एच.एस. प्रणॉय यांचे प्रामुख्याने नाव घ्यायला हवे.
जागतिक अजिंक्यपद, सुपर सीरिज, ग्रँड प्रिक्स, ग्रँड प्रिक्स गोल्ड आदी स्पर्धांमध्ये कामगिरीचा आढावा घेतल्यास, भारतीय खेळाडूंच्या प्रगतीचा वेग नक्की लक्षात येईल. नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीयांनी २६ सुवर्ण, २० रौप्य आणि २० कांस्य अशा एकूण ६६ पदकांची कमाई केली होती. यात बॅडमिंटनचा वाटा ६ पदकांचा (२ सुवर्ण, ३ रौप्य व १ कांस्य) होता. म्हणजेच दहा टक्के... त्यात विशेष म्हणजे पाच खेळाडूंनी सुवर्णपदकाच्या शर्यतीपर्यंत मजल मारली. राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धा यांची तुलना आणि इतिहास लक्षात घेता जकार्तात भारतीय खेळाडू गोल्ड कोस्टसारखी कामगिरी करतील, अशी अपेक्षा करणे म्हणजे थोडे धाडसच होईल.
पण ते धाडस करायला खरेच हरकत नाही. २०१४च्या इंचिओन आशियाई स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूंना केवळ एकाच (कांस्य) पदकावर समाधान मानावे लागले होते. पण त्यानंतरच्या चार वर्षांत विशेषत: चीन, जपान, कोरिया यांचे वर्चस्व असलेल्या बहुतांश स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी आपले नाणे खणखणीत वाजवले. चिनी वर्चस्वाला आव्हान देण्याची शिकवण आपल्याला सायनाने दिली आणि त्यामुळे चीनची मक्तेदारी असलेल्या या खेळात भारताने स्वत:चे एक स्थान निर्माण केले. तिने निर्माण केलेली जिंकण्याची भूक काळानुसार वाढतच गेली आहे.
फुलराणी सायनाने रचलेल्या भक्कम पायावर पी. व्ही. सिंधू पदकाचे हळूहळू इमले रचत गेली. आॅलिम्पिकमधील रौप्यपदक आणि जागतिक स्पर्धेतील चार पदकं (दोन रौप्य व दोन कांस्य) ही त्याचीच साक्ष देतात. याशिवाय सिंधूने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या. खऱ्या अर्थाने ती अपल्यासाठी अभेद्य ‘सिंधु’दुर्गच ठरली आहे. अंतिम फेरीतील तणावात होणारा खेळ वगळला तर सिंधूने भल्याभल्यांना पराभूत केले आहे. या प्रवासात सायनाला दुखापतीमुळे मागे राहावे लागले. पण राष्ट्रकुलच्या सुवर्णपदकाने तिने गमावलेला आत्मविश्वास पुन्हा मिळवला आणि बॅडमिंटन चाहत्यांना आशियाई स्पर्धेत या दोन खेळाडूंमध्ये सुवर्णपदकाची लढत पाहायला नक्की आवडेल.
पुरुषांमध्ये किदाम्बी श्रीकांत आणि एच.एस. प्रणॉय यांच्यावर भिस्त असली तरी खरी मदार किदाम्बीवर आहे. त्याचे सातत्य हेच यशामागचे गमक... २०१७ मध्ये त्याने चार सुपर सीरिज जेतेपदं जिंकली. ली चाँग वेई, लीन डॅन, चेन लाँग या दिग्गजांना नमवण्याचा पराक्रम त्याने केला. त्यामुळे आशियाई स्पर्धेतील त्याची कामगिरी पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे. प्रणॉयकडे दुर्लक्ष करून चालणारे नाही. श्रीकांतसारखी त्याची कामगिरी उठावदार झाली नसली तरी तो डार्क हॉर्स ठरू शकतो.
सात्त्विकराज रंकीरेड्डी - चिराग शेट्टी, मनू अत्री-बी सुमित रेड्डी, एन. सिक्की रेड्डी, प्रणव चोप्रा या युवा खेळाडूंसह अनुभवी अश्विनी पोनप्पा आशियाई स्पर्धेत आपला दबदबा गाजवण्यासाठी सज्ज आहेत. भारताला मागील १४ आशियाई स्पर्धेत एकदाही कांस्यपदकाची वेस ओलांडता आलेली नाही. ती यंदा ओलांडण्यात भारतीय खेळाडू यशस्वी होतील, असा विश्वास गोपिचंद यांच्याप्रमाणे सर्व भारतीयांना वाटत आहे. तो विश्वास नक्कीच सार्थ ठरेल.
संकलन : स्वदेश घाणेकर

Web Title: Asian Games 2018 : This chance to give badminton a golden glow!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.