जकार्ता - भारतीय महिला संघाला बॅडमिंटनचे पदक निश्चित करण्यासाठी केवळ एका विजयाची आवश्यकता होती, परंतु त्यांना तोही मिळवण्यात अपयश आले. ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूने भारताला विजयी सुरूवात करून दिली, परंतु अन्य खेळाडूंनी जपानसमोर शरणागती पत्करली. जपानने 3-1 अशा विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश करताना निदान कांस्यपदक निश्चित केले आहे. ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूने महिली एकेरीच्या लढतीत जपानच्या अकाने यामागुचीवर 21-18, 21-19 असा विजय साजरा करून भारताला आघाडी मिळवून दिली आहे. मात्र, दुहेरीत सारा सुनील आणि एन सिक्की रेड्डी यांना पराभप पत्करावा लागल्याने जपानने सामन्यात 1-1 असे पुनरागमन केले आहे. जपानच्या सयाका हिरोटा आणि युकी फुकुशिमा यांनी 21-15, 21-6 असा सहज विजय मिळवला. सर्वांच्या नजरा महिला एकेरीच्या लढतीकडे वळल्या. सायना नेहवालने संघर्षपूर्ण खेळ करताना भारताच्या आशा जीवंत राखण्याचा प्रयत्न केला, परंतु नोझोमी ओकुहाराचे कडवे तिला परतवता आले नाही. दुसऱ्या सेटमध्ये सायनाने 8-11 आशा पिछाडीवरून मुसंडी मारताना 25-23 अशा विजयासह सामना 1-1 असा बरोबरीत आणला, परंतु तिला पुढील सेटमध्ये 16-21 अशी हार मानावी लागली. ओकुहाराने जपानला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली.दुसऱ्या दुहेरीत सिंधू आणि अश्विनी पोनप्पा यांच्याकडून चमत्काराची अपेक्षा होती, मिसाकी मात्सुटोमो व अयाका ताकाहाशी या जोडीने भारताचे आव्हान संपुष्टात आणले.