जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धाः अंतिम फेरीत दबावाचा सामना करण्यात अपयशी ठरण्याचे पी. व्ही. सिंधूचे सत्र आशियाई स्पर्धेतही कायम राहिले. चायनीज तैपेईच्या ताय त्झु यिंगने 21-13, 21-16 अशा फरकाने विजय मिळवून सुवर्णपदक नावावर केले. सिंधूला पुन्हा एकदा रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले.
मंगळवारच्या लढतीपूर्वी सिंधूची यिंगविरूद्घ जय-परायजयाची आकडेवारी 3-9 अशी आहे. चायनीज तैपेईच्या खेळाडूने सुरुवातच आक्रमणाने केली. तिने दमदार स्मॅश आणि नेट प्लेसिंगचा सुरेख खेळ करताना अवघ्या 16 मिनिटांत पहिला गेम 21-13 असा जिंकला. या गेममध्ये सिंधूने कमबॅक करण्याचे प्रयत्न केले, परंतु तिला नशीबाची साथ लाभली नाही. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या ताय त्झु यिंने 11-7 अशी आघाडी घेतली होती. त्यात सातत्याने गुणांची भर घालताना तिने हा गेम घेतला.