Asian Games 2018: 'सुवर्ण'मने जिंकलेले रौप्यपदक; सिंधू व सायनाचे आभार!
By स्वदेश घाणेकर | Published: September 2, 2018 01:10 PM2018-09-02T13:10:28+5:302018-09-03T11:18:28+5:30
प्रचंड अपेक्षांचे ओझे खांद्यावर घेऊन भारतीय बॅडमिंटन चमू आशियाई स्पर्धेसाठी जकार्ता येथे दाखल झाला. मागील चार वर्षांतील भारतीय बॅडमिंटनपटूची कामगिरी ध्यानात घेता यंदा आशियाई स्पर्धेत भारत पदकांची लयलूट करेल, असे तर्क होते, तसे झाले नाही. पण जे यश मिळवले त्याचे तेज सुवर्णपदकापेक्षा इतकेच आहे, हेही तितकेच खरे.
- स्वदेश घाणेकर
प्रचंड अपेक्षांचे ओझे खांद्यावर घेऊन भारतीय बॅडमिंटन चमू आशियाई स्पर्धेसाठी जकार्ता येथे दाखल झाला. मागील चार वर्षांतील भारतीय बॅडमिंटनपटूची कामगिरी ध्यानात घेता यंदा आशियाई स्पर्धेत भारत पदकांची लयलूट करेल, असे तर्क होते, तसे झाले नाही. पण जे यश मिळवले त्याचे तेज सुवर्णपदकापेक्षा इतकेच आहे, हेही तितकेच खरे.
आशियाई स्पर्धेचा इतिहास पाहता भारताने बॅडमिंटनमध्ये २०१४पर्यंत ८ पदकं जिंकली होती आणि तिही कांस्य... त्यात एकेरीतील एकच पदक होत आणि बाकी दुहेरीत होती. त्यामुळे जकार्तात कांस्यची वेस ओलांडण्याचे आव्हान तर होतेच शिवाय वैयक्तिक कामगिरी उंचावण्याचीही जबाबदारी होती. ती पेलण्यात काही गटांत आपण अपयशी ठरलो. पुरुष गटात किदम्बी श्रीकांतकडून फारच अपेक्षा लावल्या होत्या, पण दुसऱ्या फेरीतच त्याला अपयश आले. एच एस प्रणॉयनेही तोच कित्ता गिरवला. पुरुष दुहेरी, पुरुष सांघिक, महिला दुहेरी, महिला सांघिक आणि मिश्र दुहेरी या सर्व गटांत आपल्याला अपयशाचे तोंड पाहावे लागले.
इतकी वर्षे सांघिक प्रकारातील एक तरी पदक निश्चित असा इतिहास असूनही बॅडमिंटनपटूंला आलेले अपयश नैराश्यवादी होते. पण, सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू या महिला एकेरीतील दिग्गज खेळाडूंनी भारतीयांची निराशा दूर केली. चिनी वर्चस्वाला धक्का देणाऱ्या या भारतीय महिलांनी एकेरीत पदक जिंकले. 1982 नंतर प्रथमच भारतीय बॅडमिंटनपटूंना एकेरीतील पदक जिंकण्यात यश आले. सायनाने कांस्य तर सिंधूने रौप्यपदकाची कमाई केली. आशियाई स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारी सिंधू ही पहिलीच भारतीय ठरली.. त्यामुळे तिच्याकडून सुवर्णपदकाची अपेक्षा होती. ते पूर्ण करण्यात ती अपयशी ठरली, परंतु तिच्या या रौप्यकमाईने अनेक 'सुवर्ण'मने जिंकली आहेत. सायना व सिंधूच्या या ऐतिहासिक कामगिरीचा भारतीयांना सार्थ अभिमान आहे.
सिंधू व सायनाचा वारसा कोणाकडे?
आशियाई स्पर्धेत सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांनी भारताला यश मिळवून दिले, परंतु चार वर्षांनंतर त्यात सातत्य राखणे हे मोठे लक्ष्य त्यांच्यासमोर आहे. सायनाचा विचार केला, तर पुढील आशियाई स्पर्धेपर्यंत ती बॅडमिंटनमध्ये सक्रिय राहील की नाही, हा चर्चेचा विषय आहे. सिंधूच्या बाबतीत तसा विचार सध्या नसला तरी 2020च्या ऑलिम्पिक स्पर्धेतील कामगिरीवर तिची पुढील वाटचाल अवलंबून आहे. अशा परिस्थित या दोन्ही खेळाडूंचा वारसा पुढे चालवणारी पिढी तयार होणे गरजेचे आहे. तसे झाले तर उत्तम, अन्यथा येरे माझ्या मागल्या...
चिनी वर्चस्वाला धक्का
बॅडमिंटनमध्ये चिनी खेळाडूंची नेहमीच दादागिरी राहिली आहे, परंतु ही आशियाई स्पर्धा त्याला अपवाद ठरली. स्पर्धा इतिहासात प्रथमच पुरुष एकेरीत चिनी खेळाडू अंतिम फेरीत प्रवेश करण्यात अपयशी ठरला. त्याशिवाय 2014च्या तुलनेत त्यांची पदकांची संख्या तीनने कमी झाली. 2014 मध्ये चिनच्या खात्यात 4 सुवर्ण, 3 रौप्य आणि 2 कांस्य अशी एकूण 9 पदकं होती आणि 2018 मध्ये ती संख्या सहावर ( 3 सुवर्ण, 1 रौप्य व 2 कांस्य) आली.
इंडोनेशियाचे वाढते महत्त्व
इंडोनेशियाने 2014च्या तुलनेत यंदा घरच्या प्रेक्षकांसमोर पदक संख्या दुपटीने वाढवली आहे. 2014 मध्ये 2 सुवर्ण व प्रत्येकी 1 रौप्य व कांस्य पदकांसह इंडोनेशियाने एकूण 4 पदकं जिंकली होती. ती 2018 मध्ये 8 झाली आहेत. त्यात 2 सुवर्ण, 2 रौप्य आणि 4 कांस्यपदकांचा समावेश आहे.