जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धा : आशियाई स्पर्धेत महिला एकेरीत ऐतिहासिक पदक जिंकण्याचा मान बॅडमिंटनपटू सायना नेहवालने पटकावला. १९८२ नंतर भारताचे बॅडमिंटन एकेरीतील हे पहिलेच पदक ठरले. पण उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागल्याने सायनाला पदकाचा रंग बदलता आला नाही. तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले, परंतु पहिली भारतीय महिला पदकविजेती बॅडमिंटनपटूचा मान हा तिचाच राहिला. फुलराणी सायनाने भारताला पुन्हा एकदा अविस्मरणीय क्षण अनुभवायची संधी दिली. 1982 नंतर आशियाई स्पर्धेत भारताला बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत सय्यद मोदी यांनी कांस्यपदक जिंकून दिले होते. त्यानंतर आशियाई स्पर्धेतील एकेरीत सायनाने पदक जिंकले. उपांत्य फेरीत जागतिक क्रमावारीत अव्वल असलेल्या चायनीज तैपेईच्या ताय त्झुंयिंगकडून सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या तैपेईच्या खेळाडूने सरळ गेममध्ये 21-17, 21-14 असा विजय मिळवला. पण, या पराभवानंतरही सायनाचे बाबा हरवीर सिंग यांचा आनंद गगनात मावेनासा होता. त्यांनी लगेचच आपल्या लाडक्या लेकिच्या ऐतिहासिक कामगिरीसाठी गिफ्ट खरेदी केले. पदकवितरण सोहळा पार पडताच हरवीर यांनी सायनाला एक सोन्याची अंगठी दिली. सायनाने अंगठी बोटात घातली आणि सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून बाबांचे आभार मानले.