बॅडमिंटन : तनिशाची सुवर्ण घोडदौड!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2018 08:32 PM2018-08-06T20:32:59+5:302018-08-06T20:33:03+5:30
हैदराबाद येथील अखिल भारतीय बॅडमिंटन मानांकन स्पर्धेत सुवर्णपदक
पणजी : नागपूर येथे ऐतिहासिक असे दोन सुवर्ण पटकाविल्यानंतर गोव्याची उदयोन्मुख बॅडमिंटनपटू तनिशा क्रास्तो हिने आपली सुवर्ण घोडदौड कायम राखली. हैदराबाद येथील अखिल भारतीय मानांकन बॅडमिंटन स्पर्धेतही तिने दुहेरीत सुवर्णपदक पटकाविले. १५ वर्षीय तनिशाने आपली उत्तराखंडची जोडीदार आदिती भट्ट हिच्यासोबत खेळताना १७ वर्षांखालील मुलींच्या दुहेरीत गटात विजेतेपद पटकाविले. या जोडीने सलग दुसºयांदा सुवर्णमय कामगिरी केली.
नागपूर येथे झालेल्या अखिल भारतीय मानांकन स्पर्धेत तनिशा १७ वर्षांखालील मिश्र आणि मुलींच्या दुहेरी गटातील विजेतेपद पटकाविले होते. आता या सत्रात तिच्या नावे तीन सुवर्णपदक जमा झाले आहेत. हैदराबाद येथील पुलेला गोपीचंद अकादमीत झालेल्या अंतिम सामन्यात तनिशा आणि आदिती या जोडीने उत्तर प्रदेशच्या पाचव्या मानांकित शैलेजा शुक्ला आणि श्रुती मिश्रा या जोडीचा २३-२१, २१-१६ अशा फरकाने पराभव केला. नागपूर आणि हैदराबाद येथील ही स्पर्धा म्यानमार येथे होणाºया ज्युनियर आशियन स्पर्धेसाठीची निवड चाचणी होती. त्यामुळे दोन्ही स्पर्धेत शानदार प्रदर्शन करणाºया गोव्याच्या तनिशासाठी आशियाई स्पर्धेसाठी निवड होणार, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
या कामगिरीनंतर तनिशा म्हणाली, "सुवर्णमय कामगिरीने मी खूप आनंदी आहे. मी माझ्या प्रशिक्षक आणि पालकांना धन्यवाद देते. आता पुढील स्पर्धांत अशीच कामगिरी करणे, हे माझे ध्येय असेल. महिलांमध्ये पहिल्या क्रमांकावर स्थान मिळवणे आणि ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण मिळवणे हे माझे स्वप्न आहे. हा खूप मोठा प्रवास असेल याची मला कल्पना आहे. परंतु,मी त्याच दृष्टिकोनाने तयारी करीत आहे."
"तनिशा खूप मेहनती आहे. ती सध्या दहाव्या वर्गात असून तिच्यासोबत पुस्तकेही असतात. डिसेंबरपर्यंत ती खेळणार आणि त्यानंतर ती मार्चपर्यंत परीक्षेकडे लक्ष देणार. त्यानंततर पुन्हा ती अकादमीत सराव करेल," असे तनिशाचे वडील क्लिफर्ड क्रास्तो यांनी सांगितले.
" तनिशाच्या कामगिरीचे गोवा बॅडमिंटन संघटनेकडून अभिनंदन. तनिशा खास दुहेरीतील खेळाडू आहे. गोव्यासाठी तिची ही पहिलीच स्पर्धा होती. अत्यंत कमी वेळेत तिने गोव्याच्या वरिष्ठ खेळाडूंनाही मागे टाकत राष्ट्रीय स्तरावर छाप सोडली ओह. तिची कारकीर्द अत्यंत वेगाने प्रगतीपथावर आहे. तिची आशियाई स्पर्धेसाठी निवड होईल, याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. नक्कीच आमच्यासाठी हा गौरवाचा क्षण आहे., " असे गोवा बॅडमिंटन संघटनेचे सचिव संदिप हेबळे यांनी सांगितले.