नवी दिल्ली : आॅलिम्पिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू यंदाच्या आपल्या कामगिरीमुळे समाधानी आहे; पण मोसमाचा शेवट बुधवारपासून प्रारंभ होत असलेल्या दुबई विश्व सुपर सीरिज फायनलमध्ये आणखी एक जेतेपद पटकावून करण्यास उत्सुक आहे.गेल्या वर्षी रिओ आॅलिम्पिकमध्ये रौप्यपदकाची मानकरी ठरलेल्या सिंधूने यंदा इंडिया ओपन सुपर सीरिज व कोरिया ओपन सुपर सीरिजमध्ये जेतेपद पटकावले, तर ग्लास्गो विश्व चॅम्पियनशिप व हाँगकाँग ओपनमध्ये तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.सिंधू म्हणाली, ‘माझ्यासाठी यंदाचे वर्ष चांगले गेले. मी माझ्या कामगिरीवर समाधानी आहे. मी दोन सुपर सीरिज स्पर्धेत जेतेपद पटकावले तर एकदा उपविजेती ठरली. विश्व चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक पटकावले. यंदाच्या मोसमातील कामगिरीबाबत मला कुठलेही शल्य नाही. आता दुबई सुपर सीरिज फायनल्समध्ये चांगली कामगिरी करीत वर्षाचा शेवट करण्यास इच्छुक आहे.’आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सलग पाच स्पर्धा खेळणारी सिंधू म्हणाली, ‘सराव चांगला सुरू आहे. मला प्रत्येक लढतीसाठी सज्ज राहावे लागेल. प्रत्येक महिन्यात होणाºया स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर मी वर्कलोडचे चांगले व्यवस्थापन केले आहे. त्यामुळे मी खूश आहे.’विश्व बॅडमिंटन महासंघाने (बीडब्ल्यूएफ) आंतरराष्ट्रीय सर्किटमध्ये बदल केला आहे. आघाडीच्या १५ मध्ये समावेश असलेल्या खेळाडूंना पुढील वर्षी किमान १२ स्पर्धांमध्ये खेळणे अनिवार्य केले आहे. पुढील वर्षीच्या कार्यक्रमाबाबत बोलताना सिंधू म्हणाली, ‘माझ्या मते पुढील वर्षीचा कार्यक्रम व्यस्त राहील आणि आम्हाला त्यानुसार योजना तयार करावी लागेल व स्पर्धेत सहभागी व्हावे लागेल. प्रत्येक स्पर्धा महत्त्वाची ठरणार असून त्याचसोबत राष्ट्रकूल व आशियाई स्पर्धा यांसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धाही आहेत.’ (वृत्तसंस्था)गेल्या वर्षी दुबई स्पर्धेत उपांत्य फेरी गाठणारी सिंधू म्हणाली, ‘स्पर्धेत सर्व आघाडीचे खेळाडू सहभागी होणार असल्यामुळे जेतेपद पटकावणे सोपे नाही. पहिल्या फेरीपासूनचसर्व लढती चुरशीच्या होतील. त्यामुळे दुबईत चांगली कामगिरी करण्यासाठी मला चांगली सुरुवात करावी लागेल.’२२ वर्षीयसिंधू यंदा सर्व १२ सुपर सीरिज स्पर्धेत सहभागी झाली. याचे सर्व श्रेय सिंधूने सरावसत्राला दिले. यामुळे वर्कलोड सहन करता आले, असेही तिने सांगितले.
दुबई विश्व सुपर सीरिज फायनल : मोसमाचा शेवट करण्यास सिंधू उत्सुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 4:33 AM