पॅरिस : भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू के. श्रीकांतने आपलाच सहकारी एच.एस. प्रणॉयला २-१ गेममध्ये पराभूत करून फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली. श्रीकांतला पहिल्या गेममध्ये त्याच्या मनासारखा खेळ करता आला नाही. सूर न गवसलेल्या श्रीकांतला पहिली गेम १४-२१ ने गमवावी लागली. पण दुसºया आणि तिसºया गेममध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून अनुक्रमे २१-१९ आणि २१-१८ असे गेम जिंकून प्रणॉयला पराभूत केले. ही लढत १ तास २ सेकंद चाली होती. या सत्रातील चौथे विजेतेपद जिंकण्यासाठी श्रीकांतची अंतिम फेरीत लढत जपानच्या केन्टा निशीमोटोविरुद्ध होईल. निशीमोटोने उपांत्य फेरीत डेन्मार्कच्या अॅन्ड्रेस अॅन्टोसेनला सरळ दोन सेटमध्ये २१-१७, २१-१५ असे पराभूत केले.दुसरीकडे महिलांच्या एकेरीत विश्व चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकणारी पी. व्ही. सिंधू अपेक्षेनुसार कामगिरी करू शकली नाही. तिला जपानच्या अकाने यामागुचीने उपांत्य फेरीत २१-१४, २१-९ असे पराभूत करून अंतिम फेरीत पोहोचण्याचे तिचे स्वप्न भंग केले.पाचव्या मानांकित यामागुचीने भारतीय खेळाडूचे आव्हान अवघ्या ३७ मिनिटांत मोडीत काढले. तिने पहिला गेम १९ आणि दुसरा गेम १८ मिनिटांत जिंकला. पहिल्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंत कडवी झुंज पाहायला मिळाली आणि एकवेळ १४-१४ अशी बरोबरी दोन्ही खेळाडूंत होती; परंतु यामागुचीने सलग सात गुण जिंकत पहिला गेम जिंकला.यामागुचीने आपल्या शक्तिशाली स्मॅशवर सिंधूला नेटजवळ येण्याची संधी मिळू दिली नाही. दुसºया गेममध्येदेखील यामागुची हिचे वर्चस्व राहिले. तिने सुरुवातीलाच ५-0 आणि नंतर ब्रेकपर्यंत ११-२ अशी आघाडी घेतली होती.
फ्रेंच ओपन : के. श्रीकांत अंतिम फेरीत, प्रणॉयचा केला पराभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 3:26 AM