सलाम तुझ्या जिद्दीला.. थायलंड पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या मानसीला कांस्य
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 09:17 PM2018-08-14T21:17:37+5:302018-08-14T21:19:23+5:30
एका पायावरही बॅडमिंटन खेळला जाऊ शकतो आणि त्यात आंतरराष्ट्रीय भरारी घेता येते हे सगळ्या जगाला दाखवून दिलं ते भारताच्या मानसी जोशी हिने.
सचिन कोरडे
बॅडमिंटनमध्ये सायना, सिंधूचे नाव आता सर्वपरिचित. पायांच्या हालचाली हे या खेळातील एक गमकच. पण एका पायावरही बॅडमिंटन खेळला जाऊ शकतो आणि त्यात आंतरराष्ट्रीय भरारी घेता येते हे सगळ्या जगाला दाखवून दिलं ते भारताच्या मानसी जोशी हिने.
मानसी ही पॅरा बॅडमिंटनपटू. तिने नुकतेच थायलंड येथे झालेल्या पॅरा बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्यपदक पटकाविले. गळ्यात पदक पडावं असं ती सातत्याने स्वप्न बघायची. या स्वप्नाचा पाठलाग करण्यासाठी ती धडपडायची. अखेर तिची जिद्द फळाला आली. मानसीने पदक जिंकत इतरांना प्रेरणा ठरावी अशी कामगिरी केली.
बरोबर सहा वर्षांपूर्वी गुजरातची अभियंता असलेल्या २९ वर्षीय मानसीचा मुंबईत अपघात झाला. या अपघातात तिने एक पाय गमावला. पाय गमावल्याचा धक्का तिला जरूर बसला होता; मात्र तो तिच्या स्वप्नांना तुडवू शकला नाही. ती खेळण्याचा प्रयत्न करू लागली. ब्लेड फुटच्या साहाय्याने ती उभी झाली. अखेर तिने एसएल-३ या एकेरी गटात कांस्य जिंकले. आता ती जकार्ता येथे आॅक्टोबरमध्ये होणाऱ्या पॅरा आशियाई स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी उत्सुक आहे.
पदक पटकावल्यावर मानसी म्हणाली, " माझ्यापुढे आव्हानं खूप आहेत. सर्वात मोठे आव्हान होते ते या समाजाचे. समाजात आजही खूप अपंग खेळाडू आहेत, ज्यांना आधाराची गरज आहे. प्रत्येकालाच आधार मिळतोय असे नाही. त्यांनाही उभे राहायचे आहे. बºयाच प्रेरणादायी कथा आहेत. ज्या माझ्यासारख्यांना बळ देतात. त्यांना मी धन्यवाद देते. मला पूर्ण विश्वास आहे की, अपंगांमध्ये ज्ञान आणि कौशल्य आहे. याच्या आधारावर ते इतरांसाठीही प्रेरणादायी ठरूशकतात. गोपीचंद सरांकडून मी मार्गदर्शन घेतले. त्यांचे सहकार्य माझ्यासाठी खूप मोलाचे आहे."
दरम्यान, मानसीला लहानपणापासून बॅडमिंटन खेळायला आवडते. २०१५ पासूनती आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत आहे. तिने २०१५ मध्ये विश्व चॅम्पियनशीपमध्ये मिश्र गटात कांस्यपदक आणि त्यानंतर २०१७ मध्ये कांस्यपदक पटकाविले. स्पॅनिश आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही तिने सुवर्णमय कामगिरी केली आहे.