नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणारा भारताचा अव्वल पुरुष बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतने रँकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे. श्रीकांत पुरुष एकेरीत रँकिंगमध्ये दुस-या स्थानावर पोहोचला आहे. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने ही क्रमवारी जाहीर केली. 24 वर्षांचा श्रीकांत सध्या भन्नाट फॉर्ममध्ये असून, त्याने 2017 साल सुरु झाल्यापासून आतापर्यंत चार सुपर सीरिज स्पर्धांची जेतेपद पटकावली आहेत. श्रीकांतने 73,403 गुणांसह दुस-या स्थानावर झेप घेतली.
भारताच्या कुठल्याही पुरुष बॅडमिंटनपटूने केलेली ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली. पुरुष एकेरीत विक्टॉर अॅक्सलसेन पहिल्या स्थानावर आहे. एचएस प्रणॉयच्या रँकिंगमध्ये एका स्थानाची सुधारणा झाली असून, तो 11 व्या स्थानावर पोहोचला आहे. महिला एकेरीत पी.व्ही.सिंधून दुस-या स्थानावर आणि सायना नेहवाल 11 व्या स्थानावर कायम आहे.
श्रीकांत भन्नाट फॉर्ममध्ये असून, त्याने यावर्षात सुपर सीरिजची चार जेतेपद पटकावली आहेत. वर्षभरात इतकी विजेतेपद मिळवणारा श्रीकांत भारताचा पहिला बॅडमिंटनपटू आहे. सिंगापूर ओपन सुपर सीरिजमध्ये श्रीकांतला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. बी.साई प्रणीथने श्रीकांतचा पराभव केला होता. सुपर सिरीजच्या अंतिमफेरीत दोन भारतीय बॅडमिटनपटू समोरासमोर येण्याची ही पहिलीच वेळ होती.
तीन वर्षापूर्वी श्रीकांतने अक्षरशः मृत्युलासुध्दा मात दिलीवर्षाला चार-चार सुपर सिरिज स्पर्धा जिंकणारा तो केवळ चौथाच खेळाडू आहे. अवघ्या 24 वर्षे वयाच्या गुंटुरच्या या खेळाडूच्या नऊ वर्षांच्या कारकिर्दीत आलेली ही दोन महाभयानक संकट कोणती होती? आणि त्याने त्यावर कशी मात केली? हे जाणून घेण्यासाठी आपल्याला 2014 मध्ये जावे लागले. त्यावर्षीच्या जुलैमध्ये नेमक्या राष्ट्रकुल सामन्यांच्या तोंडावर त्याला डोकेदुखीचा त्रास जाणवू लागला आणि एका दिवशी त्याचे थोरले बंधू, के. ननगोपाळ यांना तो बाथरुममध्ये बेशुध्दावस्थेत आढळून आला. त्यांनी तातडीने श्रीकांतला दवाखान्यात हलवले. त्याला अतिदक्षता विभागात अॅडमिट करण्यात आले आणि चाचण्यांअंती श्रीकांतला मेंदूज्वर असल्याचे निदान झाले. दोन आठवडे त्याच्यावर औषधोपचार चालले परंतु राष्ट्रकुल सामने तोंडावर असल्याने त्याला अँटीबायोटीक्स घेण्यास परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे या आजारातून पूर्ण सावरलेला नसतानासुध्दा राष्ट्रकुल सामन्यांमध्ये खेळताना त्याने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली. यानंतर काही दिवसातच चीन ओपन स्पर्धा जिंकताना लीन दान याला 21-19, 21-17अशी मात देत त्याने सर्वांनाच आश्चर्यचकित केले.