पॅरिस: भारताची स्टार शटलर पी. व्ही. सिंधू हिने अपेक्षित कामगिरी करताना फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या दुस-या फेरीत प्रवेश केला. एकतर्फी झालेल्या सामन्यात सिंधूने अमेरिकेच्या बेइवान झांग हिचा सरळ दोन गेममध्ये पराभव केला. या झांगविरुद्ध सिंधूचा याआधी झालेल्या डेन्मार्क ओपन स्पर्धेच्या पहिल्या फेरीत पराभव झाला होता. त्या पराभवाचा वचपा यावेळी सिंधूने घेतला.तिसरे मानांकन लाभलेल्या सिंधूने जबरदस्त खेळ करताना केवळ ३४ मिनिटांत बाजी मारत झांगला २१-१७, २१-८ असे नमवले. सिंधूच्या वेगवान खेळापुढे झांगला आपला खेळ करता आला नाही. यासह सिंधूने झांगविरुद्धचा रेकॉर्ड ३-३ असा केला.सिंधूने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत ७-४ अशा आघाडीसह इरादा स्पष्ट केला. झांगने यानंतर पुनरागमन करताना १०-११ अशी पिछाडी कमी करुन सामन्यात रंग भरले. दोघींमध्ये १६ गुणांपर्यंत अटीतटीचा खेळ झाला. यानंतर सिंधूने तुफानी खेळ करत झांगला पराभूत केले. दुसºया गेममध्ये सिंधूपुढे झांगचा काहीच निभाव लागला नाही.दुसरीकडे पुरुष दुहेरीत अर्जुन एम. आर - श्लोक रामचंद्रन या भारतीय जोडीचा सलामीलाच चीनच्या ली जुंहुई - लियु युनशेन यांच्याकडून १४-२१, १७-२१ असा पराभव झाला. (वृत्तसंस्था)
पी. व्ही. सिंधूची दुसऱ्या फ्रेंच ओपनच्या फेरीत धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 3:39 AM