सिडनी - भारतीय खेळाडू बी. साईप्रणित आणि समीर वर्मा यांनी लौकीकाला साजेसा खेळ करीत सरळ गेममधील विजयासह गुरुवारी आॅस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली.पुरुष एकेरीत दुसरे मानांकन लाभलेल्या प्रणितने दुसऱ्या फेरीत इंडोनेशियाचा पंजी अहमद मौलाना याच्यावर २१-१२,२१-१४ ने विजय नोंदविला. चौथा मानांकित समीरने जपानचा ताकुमा उएदावर २१-१६,२१-१२ ने विजय साजरा केला. प्रणितची गाठ सातवा मानांकित इंडोनेशियाचा चेयूक यिऊ याच्याशी तर समीरची गाठ चीनचा लू गुआगुंजू याच्याशी पडणार आहे.भारतीय खेळाडूंनी दुहेरीतही सामने जिंकले. मनू अत्री- बी सुमित रेड्डी या तिसºया मानांकित जोडीने कोरियाचे ह्यूक चोई- क्यूंग पार्क यांचा २१-१७,२१-१७ ने पराभव करीत उपांत्य फेरी गाठली. सातवा मानांकित अर्जून आणि श्लोक रामचंद्रन यांनी देखील उपांत्यफेरी गाठली पण त्यासाठी त्यांना बराच घाम गाळावा लागला. जपानचे खेळाडू हिरोकी ओकामुरा- मासायुकी ओनोडेरा यांनी भारतीय जोडीने कडवे आव्हान दिले. कडव्या संघर्षात भारतीय जोडीने हा सामना २१-१५,२५-२३ ने जिंकला. पुढील फेरीत दोन्ही भारतीय जोड्या एकमेकांविरुद्ध खेळतील. (वृत्तसंस्था)एकेरीत आव्हान संपुष्टातसायना आणि सिंधू यांच्या अनुपस्थितीत महिला एकेरीत वैष्णवी रेड्डी पराभूत होताच भारताचे आव्हान संपुष्टात आले. महिला दुहेरीतही भारतीय खेळाडू पराभूत झाले. मेघना- पूर्विशा यांना जपानच्या जोडीकडून सरळ गेममध्ये पराभवाचे तोंड पाहावे लागले. शिवम शर्मा- पूर्विशा यांच्या मिश्र जोडीला देखील पराभवासह बाहेर होण्याची वेळ आली. कोरियाच्या खेळाडूंकडून भारतीय मिश्र जोडी २१-६,२१-१३ ने पराभूत झाली.
साईप्रणित, समीर वर्मा उपांत्यपूर्व फेरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 12:40 AM