सिंधू पहिल्यांदाच फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 04:22 AM2017-10-28T04:22:42+5:302017-10-28T04:23:09+5:30
पॅरिस : भारताची स्टार शटलर पी. व्ही. सिंधूने चीनच्या चेन युफेईला सरळ दोन गेममध्ये नमवून पहिल्यांदाच फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली.
पॅरिस : भारताची स्टार शटलर पी. व्ही. सिंधूने चीनच्या चेन युफेईला सरळ दोन गेममध्ये नमवून पहिल्यांदाच फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. पुरुष गटात एच.एस. प्रणॉय याने डेन्मार्कचा प्रतिस्पर्धी हॅन्स ख्रिस्टियन विटिगसला सरळ गेममध्ये नमवून उपांत्यपूर्व फेरी गाठली.
सिंधूने स्पर्धेत पहिल्यांदाच उपांत्य फेरी गाठताना जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानी असलेल्या युफेईचा केवळ ४१ मिनिटांमध्ये २१-१४, २१-१४ असा धुव्वा उडवला. याआधी गेल्या आठवड्यात डेन्मार्क ओपनच्या सुरुवातीला युफेईविरुद्ध सिंधूला पराभव पत्करावा लागला होता. आता, कोरियाची तिसरी मानांकीत सुंग जि हुन आणि जपानची पाचवी मानांकीत अकाने यामागुची यांच्यातील विजेत्याशी सिंधूचा उपांत्य सामन्यात लढत होईल.
दुसरीकडे, प्रणॉयने केवळ ३१ मिनिटांत विटिगसला २१-११,२१-१२ असे नमविले. त्याची गाठ पुढील फेरीत २०१६ च्या आॅस्ट्रेलियन ओपनची अंतिम फेरी गाठणारा कोरियाच्या जियोन हियोक याच्याविरुद्ध पडेल. पुरुष गटाच्या अन्य एका सामन्यात बी. साईप्रणित जपानच्या केंटा निशिमोतोकडून १३-२१, १७-२१ अशा फरकाने पराभूत झाला. (वृत्तसंस्था)