सिंधू हरली कारण...
By प्रसाद लाड | Published: August 5, 2018 04:13 PM2018-08-05T16:13:23+5:302018-08-05T16:13:28+5:30
जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत सिंधू का पराभूत झाली, याबद्दल सांगणारा हा लेख.
युद्ध हे फक्त शस्त्रांच्या जोरावर जिंकलं जात नाही, तर त्यासाठी कणखर मानसीकताही लागते. रणनीती आणि तिची योग्य अंमलबजावणीही लागते. गुणवत्ता, मेहनत, चिकाटी, संयम याबरोबरच वीजीगीषूवृत्ती तुमच्याकडे असायला हवी, तर तुम्ही कधीही विजय मिळवू शकता. अगदी हेच भारताच्या पी. व्ही. सिंधूला दाखवता आले नाही. दुसरीकडे आक्रमकता हे जिचं दुसरं नाव आहे, अशी स्पेनची कॅरोलिन मरिन जेतेपदाची हकदार ठरली. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत सिंधू का पराभूत झाली, याबद्दल सांगणारा हा लेख.
सिंधू आणि मरिन यांच्यामध्ये गुणवत्तेची कोणतीच कमतरता नव्हती. दोघींनी चांगली मेहनतही घेतली होती. सामना जेव्हा सुरु झाला तेव्हा एक रंगतदार, कडवी झुंज पाहायला मिळणार, असे वाटत होते. तसे काही वेळ पाहायलाही मिळाले. पण चुरशीच्या या लढतीत सिंधूने आघाडी घ्यायला सुरुवात केली. ही आघाडी तब्बल पाच गुणांच्या फरकाचीही झाली. यावेळी सिंधू पहिला गेम जिंकणार, असे वाटत होते. पण मरिन काही हार मानणारी नव्हती. तिने आक्रमकतेला धार चढवली आणि सिंधूशी पहिल्यांदा 15-15 आणि त्यानंतर 18-18 अशी बरोबरी केली. तिचे हे पुनरागमन तिला जेतेपदापर्यंत घेऊन गेले. कारण पहिला गेम तिने जिंकला आणि त्यानंतर दुसऱ्या गेममध्ये तर तिने सिंधूला डोके वर काढण्याची संधीच दिली नाही.
मरिनकडे असलेली आक्रमकता सिंधूकडे दिसली नाही. मरिन प्रत्येक गुणाला जोरदार आवाज काढत होती. आपला आक्रमकपणा हा ती खेळाच्या माध्यमातून दाखवत होती. हा आक्रमकपणाच मरिनसाठी लाभदायक ठरला. या गोष्टीचा परीणाम कुठेतरी सिंधूच्या मानसीकतेवर झाला. त्याचबरोबर सिंधू सर्व्हिस असताना मरिन तिला हात दाखवून बऱ्याचदा थांबायला सांगायची. यामुळे सिंधूची लय बिघडत गेली आणि मरिनची रणनीती यशस्वी झाली.
पहिला गेम ज्यापद्धतीने मरिनने जिंकला, ते पाहता फक्त चॅम्पियन खेळाडूच असा विजय मिळवू शकतो, हे समजते. सिंधूने पहिल्या गेममध्ये आघाडी घेतली होती. त्यानंतर मरिनचे पुनरागमन रोखण्यात तिला अपयश आले. पहिला गेम पराभूत झाल्यावर सिंधू पूर्णपणे खचून गेलेली होती. सिंधू दुसरा गेमही गमावणार, हे पहिला गेम मगावल्यावर तिच्या देहबोलीतून जाणवत होते. एक गेम गमावला म्हणजे सामन्यात आपण पराभूत झालेलो नाही, हे सिंधूने त्यावेळी समजून घ्यायला हवं होतं. मरिन आक्रमक खेळ करत असली तर तिला कोणत्या भाषेत उत्तर द्यायचे, हे सिंधूने ठरवायला हवं होतं. सिंधू पहिला गेम गमावल्यावर एवढी निष्प्रभ झाली होती की, तिच्या कानावर प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांचे संवादही पडत नव्हते. नाहीतर गोपीचंद यांनी बऱ्याचदा अशा संकटांतून खेळाडूंना बाहेर काढले आहे. पण ते मार्गदर्शन करण्याचं काम करतील, अखेर खेळाडूला मैदानात खेळायचे असते. मरिनच्या आक्रमक खेळाने सिंधूचे बिघडलेले मानसीक संतुतन, असे या सामन्याचे वर्णन करता येऊ शकते. सिंधूमध्ये गुणवत्तेची कमी नाही, नाही तर ती अंतिम फेरीपर्यंत पोहोचलीच नसती. आता तिला फक्त गरज आहे ती आपले मानसीक संतुलन राखण्याची.