श्रीकांत, प्रणॉय यांनी पर्यायी योजनांवर काम करावे - विमल कुमार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 04:54 AM2018-08-13T04:54:59+5:302018-08-13T04:55:06+5:30
किदाम्बी श्रीकांत आणि एस.एस. प्रणय यांना आगामी आशियाई स्पर्धेत पदक पटकावण्यासाठी विशेषत: दबावात असताना पर्यायी योजनांवर काम करायला हवे
नवी दिल्ली : किदाम्बी श्रीकांत आणि एस.एस. प्रणय यांना आगामी आशियाई स्पर्धेत पदक पटकावण्यासाठी विशेषत: दबावात असताना पर्यायी योजनांवर काम करायला हवे, असे मत भारतीय बॅडमिंटन संघाचे माजी प्रशिक्षक विमल कुमार यांनी व्यक्त केले.
श्रीकांत विश्व चॅम्पियनशिपच्या उपउपांत्यपूर्व फेरीत मलेशियाच्या अनुभवी डॅरेन लियूविरुद्ध पराभूत झाला होता तर प्रणयला ब्राझीलच्या विशेष ओळख नसलेल्या इगोर कोल्होविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते.
विमल कुमार म्हणाले,‘मी श्रीकांत व प्रणय यांच्याकडून निराश आहे. त्यांना आपल्या कामगिरीत सातत्य आणावे लागेल. त्यांची एक योजना अपयशी ठरली तर त्यांनी पर्यायी योजना ठेवायला हवी. त्यात ते अपयशी ठरले आहेत. ते आक्रमक खेळाडू असून परिस्थिती जर अनुकूल नसेल ते प्रतिस्पर्धी खेळाडूचे आव्हान पेलण्यास अपयशी ठरतात. त्यावर त्यांना मेहनत घ्यावी लागेल.’
विश्व चॅम्पियनशिपमध्ये ली चोंग वेईच्या अनुपस्थितीचा श्रीकांतला लाभ घेता आला नाही, त्यामुळे विमल कुमार अधिक निराश झाले. ते म्हणाले,‘श्रीकांतला ली चोंगच्या अनुपस्थितीचा लाभ घ्यायला हवा होता. कधी-कधी तुम्ही दिग्गज खेळाडूवर वर्चस्व गाजवू शकता, पण लियू हा प्रणय किंवा श्रीकांतच्या दर्जाचा खेळाडू नाही. श्रीकांतसाठी हा चांगला निकाल नव्हता.’ विमल कुमार पुढे म्हणाले,‘अशियाई स्पर्धेत काहीही घडू शकते. आघाडीच्या खेळाडूंच्या कामगिरीत सातत्य दिसत नाही. मोमोटाचा अपवाद वगळता कुणीच कामगिरीत सातत्य राखलेले नाही.’ (वृत्तसंस्था)
विश्व चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये पुरुष एकेरीत भारतीय खेळाडूंनी निराशा केली. आॅलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधूला पुन्हा एकदा रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तिला आॅलिम्पिक चॅम्पियन कॅरोलिन मरिनने नमविले होते.
सिंधूच्या कामगिरीविषयी विमल यांनी वक्तव्य केले की, ‘आशियाई स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यासाठी सिंधूला या पराभवातून लवकर सावरावे लागेल. या स्पर्धेत सिंधू भारतासाठी पदक पटकावण्यास प्रबळ दावेदार आहे.’