नागपूर : युवा प्रतिभावान बॅडमिंटनपटू वैष्णवी भाले हिने नागपूरच्या क्रीडाविश्वात मानाचा तुरा रोवला आहे. विश्व बॅडमिंटन महासंघाद्वारे (बीडब्ल्यूएफ) आयोजित प्रतिष्ठेच्या थॉमस आणि उबेर चषक स्पर्धेसाठी वैष्णवीची भारतीय महिला बॅडमिंटन संघात निवड झाली. या स्पर्धेचे आयोजन बँकॉक येथे २० ते २७ मे या कालावधीत होईल.महिला एकेरीत वैष्णवी सध्या देशात दुसऱ्या स्थानावर आहे. नुकत्याच झालेल्या अ.भा. सिनियर रँकिंग स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी केल्यामुळे तिची राष्टÑीय संघात निवड झाली. बालपणापासून वैष्णवीला खेळाचे धडे देणारे तिचे कोच आणि मास्टर्स गटातील आंतरराष्टÑीय बॅडमिंटनपटू किरण माकोडे यांनी वैष्णवीचा भारतीय संघात समावेश झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. वर्षानुवर्षे केलेल्या कठोर परिश्रमाचे फळ मिळाल्याचे माकोडे म्हणाले.माकोडे म्हणाले, ‘वैष्णवीने बालपणापासून खेळ व व्यायाम सातत्याने आत्मसात केल्या आहेत. मी तिच्यासाठी ज्या- ज्या योजना आखल्या, त्या सर्व तिने अमलात आणल्यामुळे भारतीय संघात स्थान मिळविता आले. खेळाची अपुरी साधने आणि मर्यादित सराव सुविधा असताना वैष्णवीने राष्टÑीय संघात झेप घेतली, ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे.’
वैष्णवी भाले भारतीय बॅडमिंटन संघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 12:45 AM