व्हिएतनाम ओपन बॅडमिंटन; अजय जयराम ठरला उपविजेता
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 04:57 AM2018-08-13T04:57:39+5:302018-08-13T04:58:01+5:30
भारतीय बॅडमिंटनपटू अजय जयराम याला व्हिएतनाम ओपन टूर सुपर १०० बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम लढतीत इंडोनेशियाच्या शेसार हिरेन रुस्तावितोविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला.
हो चि मिन्ह सिटी : भारतीय बॅडमिंटनपटू अजय जयराम याला व्हिएतनाम ओपन टूर सुपर १०० बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम लढतीत इंडोनेशियाच्या शेसार हिरेन रुस्तावितोविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. या निकालामुळे जयरामला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. ३० वर्षीय जयरामला रुस्तावितोने २८ मिनिट चाललेल्या लढतीत २१-१४, २१-१० ने पराभूत केले. जयराम या सर्किटमध्ये सलग दुसऱ्यांदा उपविजेता ठरला. एकतर्फी झालेल्या या लढतीत जयरामला क्वचितच आव्हान उभे करता आले.
गेल्या महिन्यात त्याला व्हाईट नाईट््स आंतरराष्ट्रीय फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला होता. स्नायूच्या दुखापतीतून पुनरागमन केलेल्या जयरामने उपांत्य लढतीत सातव्या मानांकित जपानच्या यू इगाराशी याचा २१-१४, २१-१९ असा सरळ दोन गेममध्ये पराभव केला होता. (वृत्तसंस्था)
अंतिम सामन्यात मला लय गवसली नाही. यामुळे सुरुवातीपासून माझ्याकडून चुका झाल्या. शेसारने नेटजवळ जबरदस्त वर्चस्व निर्माण केले. - अजय जयराम