मसाल्यातील या गोष्टी वाढवू शकतात तुमचं सौंदर्य!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2018 02:39 PM2018-04-07T14:39:09+5:302018-04-07T14:39:09+5:30
सौंदर्य मिळवण्यासाठी तुम्ही हजारो रूपयांच्या क्रिमवर जो खर्च करता तो वाचू शकतो. सोबतच ह्या वस्तू नैसर्गिक असल्याने त्याचे काही साईड इफेक्टही होणार नाहीत.
विविध मसाले तुमच्या जेवणाची चव वाढवतात हे तुम्हाला माहिती आहेच. मात्र, काही मसाले असेही असतात जे तुमच्या जेवणाची चव वाढवण्यासोबतच तुम्हाला सुंदरताही देऊ शकतात. तुमच्या किचनमध्ये सहज उपलब्ध असलेली हळद, दालचिनी, काळे मिरे, जीर, सोप सारख्या वस्तू तुमच्या सौंदर्यात भर घालू शकतात. यामुळे सौंदर्य मिळवण्यासाठी तुम्ही हजारो रूपयांच्या क्रिमवर जो खर्च करता तो वाचू शकतो. सोबतच ह्या वस्तू नैसर्गिक असल्याने त्याचे काही साईड इफेक्टही होणार नाहीत.
१) हळद:
किचनमध्ये सहज उपलब्ध असलेल्या हळदीचे आरोग्याला काय फायदे होतात हे सर्वांनाच ठाऊक आहे. तुम्ही तुमच्या खाण्यात हळद वापरली तर त्यामुळे तुम्हाला चमकती त्वचा मिळू शकते. हळदीमध्ये एंटीसेप्टिक गुणधर्म असतात, जे पिंपल्स, चेह-यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी फायदेशीर ठरतात. एक ग्लास दूधात हळद टाकल्याने तुमचं रक्त स्वच्छ होतं. आणि रक्त स्वच्छ झालं की, आपोआप स्किन चांगली राहते. तसेच थोडीशी हळद बेसनात एकत्र करून त्याची पेस्ट तयार करा आणि ते स्किनवर लावाल्यास ग्लो येतो.
२) काळे मिरे:
काळे मिरे म्हटलं की, कुणाच्या चेह-यावरील हावभाव बदललेले बघायला मिळतात. कारण ते तिखट असतात. पण या काळ्या मिरेचे अनेक फायदे आहेत. काळे मिरे हे त्वचेवरील टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठी मदत करतात. काळे मि-याची भुकटी करून ते फेसपॅकमध्ये मिक्स करा आणि त्वचेवर स्क्रब करा. यामुळे चेह-यावरील घाण आणि मळ साफ होतो.
3. दालचीनी:
खाण्यात सुंगध यावा यासाठी आणि स्वाद येण्यासाठी दालचीनी वापरली जाते. या दालचीनीचे अनेक आरोग्यादायी फायदे आहेत. दालचीनी वापर गरम मसाल्यात जास्त होतो. यात असलेले अॅंटी ऑक्सीडेंट, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स शरीरातील रक्ताचा प्रवाह व्यवस्थित ठेवतात आणि रक्तही शुद्ध करतात. यासोबतच यामुळे तुमचे केस चांगले आणि मजबूत राहतात. दालचीनी पावडरला फेसपॅकमध्ये एकत्र करून स्किनवर स्क्रब करू शकता.
४) बडीशेप :
जेवण झाल्यावर तोंडाला चव यावी यासाठी अनेकजण बडीशेप खातात. पण या बडीशेफेचे वेगवेगळे फायदे अनेकांना माहितच नाहीत. बडीशेपेच्या बीया त्वचेला निरोगी ठेवण्यासाठी आणि चेह-यावरील पिंपल्स नाहीसे करण्यासाठी फायद्याच्या आहेत. टोनरच्या रूपातही बडीशेपेचा वापर केला जाऊ शकतो. बडीशेपेच्या बियांना रंग बदलेपर्यंत शिजवून घ्या. त्यानंतर ते पाणी थंड होऊ द्या. ते पाणी नंतर चेह-यावर लावा. हे पाणी तुम्ही प्यायल्यास पचनक्रिया चांगली होते.
५) जीरं
जी-याच्या बीया लहान असतात पण त्याचे फायदेही अनेक आहेत. यात मोठ्या प्रमाणात फायबर असतं. ज्यामुळे पचनक्रिया चांगली होते. जि-यात असलेल्या अॅंटी ऑक्सीडेंट, इंजाइम्स, व्हिटॅमिन आणि खनिज त्वचेला हेल्दी ठेवतात. यामुळे त्वचा सुंदर आणि ताजीतवाणी दिसते.