मध्यमवयीन लोकांना फुफ्फुसाच्या कॅन्सरचा धोका अधिक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2016 5:00 PM
एका नव्या स्टडीनुसार ५० ते ६४ वयोगटातील लोकांना लंग कॅन्सर (फुफ्फुसाचा कर्करोग) होण्याची शक्यता अधिक असते.
एका नव्या स्टडीनुसार ५० ते ६४ वयोगटातील लोकांना लंग कॅन्सर (फुफ्फुसाचा कर्करोग) होण्याची शक्यता अधिक असते. वयोवृद्ध रुग्णांच्या तुलनेत मध्यमवयीन रुग्णांमध्ये ‘लेट स्टेज’मधील कॅन्सर आढळण्याची शक्यता जास्त असते. संशोधनामध्ये विश्लेषणाअंती असे दिसून आले की, ५० ते ६४ वयोगटातील रुग्णांमध्ये शेवटच्या स्तरातील फुफ्फुसाचा कर्करोग आढळण्याचे प्रमाण ६५ ते ६९ वयोगटातील रुग्णांपेक्षा अधिक असते.इंग्लंडमधील कॅन्सर रिसर्च येथील डेव्हिड केनडी यांनी माहिती दिली की, सत्तरी पार केलेल्या लोकांमध्ये सुरुवातीच्या स्तरातील कर्करोग आढळण्याची शक्यता जास्त असते.कॅन्सरची सुरुवातीची व लेट स्टेज आणि वय यांचा संबंध शोधून काढण्यासाठी वैज्ञानिकांनी 2013 इंग्लंडमधील लंग कॅन्सरच्या सुमारे ३४ हजार रुग्णांचा अभ्यास केला.यापूर्वी करण्यात आलेल्या संशोधनांमध्ये दिसून आले होते की, तरुणांपेक्षा वयोवृद्ध लोकांना मूत्राशय किंवा फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. परंतु राष्ट्रीय पातळीवर कॅन्सर डेटाचे विश्लेषण व सखोल अध्ययन करून निष्कर्ष मांडणारे हे पहिलेच संशोधन, असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.या संशोधनामुळे वयोगटानुसार उपचारपद्धती व स्रोत केंद्रित करण्यास मदत होणार आहे. कॅन्सरच्या रुग्णांचा मृत्यूदरही यामुळे कमी होऊ शकतो. दीर्घकाळ खोकला टिकणे किंवा श्वसनास त्रास होणेही फुफ्फुसाच्या कॅन्सरची लक्षणे असू शकतात. त्यामुळे लवकरात लवकर डॉक्टरांना भेटून तपासणी करून घेण्याचा सल्ला ‘कॅन्सर रिसर्च’च्या जुली शार्प यांनी दिला.