चेहरा उजळवण्यासाठी बटाट्याचा असा करा वापर!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2018 03:19 PM2018-11-08T15:19:22+5:302018-11-08T15:21:14+5:30
अनेकदा चेहऱ्याचं सौंदर्य टिकवण्यासाठी घरगुती उपायांना पसंती देण्यात येते. यामागील सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे बाजारातील केमिकलयुक्त प्रोडक्ट्स आणि त्यामुळे होणाऱ्या साइड इफेक्टपासून बचाव करणं हे असते.
अनेकदा चेहऱ्याचं सौंदर्य टिकवण्यासाठी घरगुती उपायांना पसंती देण्यात येते. यामागील सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे बाजारातील केमिकलयुक्त प्रोडक्ट्स आणि त्यामुळे होणाऱ्या साइड इफेक्टपासून बचाव करणं हे असते. असातच आपल्या घरात अगदी सहज उपलब्ध होणारा बटाटाही चेहऱ्याचं सौंदर्य वाढविण्यासाठी फायदेशीर ठरतो. बटाट्यातील व्हिटॅमिन्स, पोटॅशिअम, सल्फर आणि कॉपर त्वचा सुंदर बनवण्यासाठी उपयुक्त ठरतात. जाणून घेऊयात चेहऱ्याचं सौंदर्य वाढविण्यासाठी बटाट्याच्या रसाचा वापर करण्याबाबत...
1. त्वचेवरील डाग नाहीसे करण्यासाठी
बटाट्याचा रस आणि लिंबाचा रस एकत्र करून त्वचेवर लावा. त्यामुळे त्वचेवरील डाग नाहीसे होऊन त्वचेला उजाळा मिळतो. या मिश्रणात मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं. जे त्वचेवरील डाग दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतं.
2. टॅनिंग दूर करण्यासाठी
उन्हामध्ये बाहेर फिरल्याने सनबर्नची समस्या उद्भवते, त्यामुळे त्वचा काळवंडते. या समस्येपासून सुटका करून घेण्यासाठी बटाट्याच्या रसाचा उपयोग होतो. बटाट्याचा रस थंड करून त्वचेवर लावल्याने काळपटपणा दूर होतो.
3. त्वचेचा रखरखीतपणा दूर करण्यासाठी
त्वचेचा रखरखीतपणा दूर करण्यासाठी एक चमचा दह्यामध्ये, 2 चमचे बटाट्याचा रस एकत्र करून त्वचेवर लावा. 20 मिनिटांपर्यंत ठेवल्यानंतर कोमट पाण्याने धुवून घ्या. त्यामुळे त्वचेला पोषण मिळतं आणि रखरखीतपणा दूर होण्यास मदत होते.
4. त्वचा गोरी करण्यासाठी लाभदायक
बटाट्याच्या रसामध्ये लिंबाचा रस आणि मध मिक्स करून त्वचेवर लावा. 20 मिनिटांनी धुवून टाका. या मिश्रणामध्ये ब्लिचिंगचे गुणधर्म असतात जे त्वचेचा काळेपणा आणि डाग दूर करण्यासाठी मदत करतात.
5. रोमछिद्र स्वच्छ करण्यासाठी
बटाट्याच्या रसामध्ये बेकिंग सोडा एकत्र करा. या मिश्रणामध्ये थोडं पाणी घालून क्लिंजिंग करा. त्यामुळे त्वचेची रोमछिद्र स्वच्छ होण्यास मदत होते.