(Image Creadit : Shutterstock)
चिंचेचं नाव काढलं तरी जिभेवर अलगद आंबट चव रेंगाळते. अनेक पदार्थांमध्ये आंबट चव आणण्यासाठी त्याचप्रमाणे चटपटीत चटणी तयार करण्यासाठी चिंचेचा वापर करण्यात येतो. पण चवीला आंबट असणारी ही चिंच आपल्या त्वचेसाठीही फायदेशीर ठरते. चिंचेचा वापर करून चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी आणि चमकदार करण्यासाठी मदत होते. चिंचेपासून तयार करण्यात आलेला फेसवॉश चेहरा स्वच्छ करतो त्याचप्रमाणे यामध्ये असलेले व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स त्वचेला आवश्यक ती पोषक तत्व मिळवून देण्यासाठी मदत करतात. हा फेसवॉश तयार करण्यासाठी अत्यंत सोपा असून तुम्ही घरच्या घरीही तयार करू शकता.
वाढत्या वयाची लक्षणं कमी करण्यासाठी
चेहरा स्वच्छ करण्यासाठी चिंचेचा वापर केल्याने सुरकुत्या, चेहऱ्यावरील डाग दूर होण्यास मदत होते. त्याचसोबत त्वचा मुलायम होते. चिंचेतील पोषक तत्व चेहऱ्यावरील वाढत्या वयाची लक्षणं दूर करून तारूण्य टिकवून ठेवण्यासाठी मदत करतात.
चेहरा टोन करतात मिनरल्स
चिंचेमध्ये मोठ्या प्रमाणावर पोटॅशिअम, फॉस्फरस, मॅग्नेशिअम, कॅल्शिअम, सोडिअम, आयर्न आणि झिंक असतं. याव्यतिरिक्त चिंचेमध्ये प्रोटीनही मुबलक प्रमाणात असतं. चिंचेचा फेसवॉश चेहरा स्वच्छ करण्यासाठी वापरल्याने चेहऱ्यावर उजाळा येतो आणि चेहऱ्यावरील डाग दूर होण्यास मदत होते. चिंचेमध्ये अॅसिडिक गुण असतात. त्यामुळे हे नैसर्गिक टोनर आणि क्लिनर म्हणून काम करतात.
चिंचेचा फेसवॉश तयार करण्यासाठी साहित्य :
- 2 चमचे चिंचेचा गर
- 1 चमचा मध
- 1 चमचा दही
- 1 चमचा बदामाचं तेल
- 1 चमचा गुलाबाचं पाणी
- अर्धा चमचा व्हिटॅमिन ई पावडर
फेसवॉश तयार करण्याची कृती :
- चिंचेचा गर आणि दही एकत्र करून घ्या.
- त्यामध्ये व्हिटॅमिन ई पावडर मिक्स करा.
- एक चमचा गुलाब पाणी, मध आणि बदामाचं तेल एकत्र करून त्यामध्ये आधीचं मिश्रण एकत्र करा.
- चिंचेचा फेसवॉश तयार आहे. एखाद्या एयरटाइट कंटेनरमध्ये भरून ठेवा.
टिप : प्रत्येकाची त्वचा वेगळी असते. त्यामुळे वरील उपाय ट्राय करण्याआधी एकदा तज्ज्ञांचा सल्ला घ्या.