बीड : स्वातंत्र्य सैनिक असल्याचे बोगस प्रमाणपत्र जोडून शेकडो पाल्यांनी नौकऱ्या लाटल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. याप्रकरणाने राज्यात खळबळ उडाली होती. यावर आरोग्य विभागाने चौकशी करून बीडच्या अस्थापनेवर असणाऱ्या १७ कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे. गुरूवारी सायंकाळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी हे आदेश काढले. आता इतर विभागातील कर्मचाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत.
स्वातंत्र्य लढ्यात सहभाग नसताना खोटी कागदपत्रांच्या आधारे स्वातंत्र्यसैनिक असल्याचे गौरव पत्र मिळवून त्या आधारे जिल्ह्यातील शेकडो जणांनी निवृत्ती वेतनाचा लाभ मिळवल्याचे प्रकरण सन २००३ मध्ये समोर आले होते. शिवाय, स्वातंत्र्यसैनिक पाल्यांना देण्यात येणाऱ्या सवलतींचा लाभ घेत १०६ जणांनी जिल्ह्यात नोकऱ्याही मिळवल्या होत्या, मात्र, हे प्रकरण समोर आल्यानंतर न्यायालय व शासनाच्या आदेशानंतर आता या कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवारी बीड जिल्हा रुग्णालयातील वर्ग चारच्या आस्थापनेवरील १७ कर्मचाऱ्यांना डॉ. अशोक थोरात यांनी बडतर्फ केले.
दरम्यान, जुलै २०१८ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत पत्र देत कारवाई करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाचाही निर्णय होता. मात्र याबाबत डॉ.थोरात यांनी वरिष्ठांचे मार्गदर्शन मागविले. वरिष्ठांनी आपण सक्षम अधिकारी असल्याने आपणच यावर कारवाई करावी, असे पत्र दिले. त्यानंतर १३ फेब्रुवारीला सुनावणी ठेवण्यात आली. यामध्ये दोषी आढळल्याने वर्ग ४ च्या १७ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले. तसेच यामध्ये वर्ग ३ चे आणखी ५ कर्मचारी असल्याचे खात्रिलायक सूत्रांनी सांगितले. त्यांच्यावरही कारवाईची टांगती तलवार असल्याचे सांगण्यात येत आहे.
इतर विभागातील कर्मचाऱ्यांवरही होणार कारवाई?जिल्ह्यात १०६ जणांनी बोगस प्रमाणपत्र सादर करून नौकऱ्या मिळविल्या. मात्र हे प्रकरण चव्हाट्यावर आल्यावर कारवाई करण्यास सुरूवात झाली आहे. पहिल्यांदा आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली आहे. आता इतर विभागातील कर्मचाऱ्यांवरही कारवाई होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांचे धाबे दणाणले आहेत. या कर्मचाऱ्यांनी न्यायालय आणि मॅटचा दरवाजाही ठोठावला होता, असे सूत्रांकडून समजते.
हे कर्मचारी केले बडतर्फभानुदास एकनाथ उगले (कक्षसेवक), बबन रघुनाथ वनवे (सफाईगार), सुखदेव बाबासाहेब वनवे (सफाईगार), महारुद्र लाला किर्दांत (पहारेकरी), भागवत लोभा वडमारे (कक्षसेवक), द्वारका सुभाष नागरगोजे (प्रयोगशाळा स्वच्छक), परमेश्वर भानुदास जगताप (कक्षसेवक), तुकाराम सूर्यभान जगताप (कक्षसेवक), संगीता विठ्ठल मुळे (बाह्यरुग्ण सेवक), महारुद्र बाबासाहेब वनवे (प्रयोगशाळा परिचर), तात्यासाहेब लक्ष्मण सांबरे (कक्षसेवक), अशोक नानाभाऊ आडसूळ (कक्षसेवक), प्रकाश रघुनाथ बडगे (शिपाई), सुंदरराव दत्तात्रय बडगे (कक्षसेवक), युवराज रघुनाथ शिंदे (कक्षसेवक), प्रल्हाद भीमराव गर्कळ (कक्षसेवक), हनुमंत ज्ञानोबा तुपे (कक्षसेवक) यांना बडतर्फ करण्यात आले आहे.
बोगस प्रमाणपत्र प्रकरणाची सुनावणी घेण्यात आली. त्यानंतर १७ कर्मचाऱ्यांवर बडतर्फची कारवाई केली. - डॉ.अशोक थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड