बीड : जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन कठोर उपाय करीत असले, तरी काही तालुक्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असल्याने कोरोनाचे मीटर वाढतच आहे. गुरुवारी कोरोनाचे २१२ नवे रुग्ण आढळून आले; तर १५३ जणांनी कोरोनावर मात केली. २४ तासांतील ३ व जुने ४ अशा एकूण सात मृत्यूची नोंद गुरुवारी आयसीएमआरच्या पोर्टलवर झाली.
जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या दीडशे ते दोनशे या आकडेवारीवर मागील काही दिवसांपासून स्थिर होती; परंतु आठवडाभरापासून रुग्णवाढ दिसून येत आहे. वाढत्या रुग्णसंख्येने रोजचा दोनशेचा आकडाही पार केला आहे. गुरुवारी जिल्ह्यात ५ हजार २४१ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये ५ हजार २९ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला, तर, २१२ जण बाधित आढळून आले. नव्या बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात ३, आष्टी तालुक्यात ७१, बीड तालुक्यात ३४, धारुरमध्ये ६, गेवराईत १०, केजमध्ये १२, माजलगावात ७, परळीत २, पाटोद्यात १७, शिरुरमध्ये ३७, तर वडवणीत १३ रुग्णांचा समावेश आहे. गुरुवारी तीनजणांचा मृत्यू झाला. यामध्ये बीड शहरातील ६० वर्षीय पुरुष, केज तालुक्यातील येवता येथील ६५ वर्षीय पुरुष आणि हनुमाननगर, बीड येथील एका पुरुषाचा समावेश आहे, तर ४ जुने मृत्यूही पोर्टलवर गुरुवारी अपडेट झाले.
जिल्ह्यात एकूण बाधितांचा आकडा ९६ हजार ९२४ इतका झाला असून, ९२ हजार ७२० जणांनी कोरोनावर आतापर्यंत मात केली आहे. २ हजार ६०३ जणांचा मृत्यू झाला असून, सध्या जिल्ह्यात १६०१ रुग्ण उपचाराखाली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार व जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. पी. के. पिंगळे यांनी दिली.
--------
वाढती रुग्णसंख्या चिंताजनक
जिल्ह्यात कोरेानाची दुसरी लाट अद्यापही पुरेशा प्रमाणात ओसरली नाही. मराठवाड्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बीडमध्ये सर्वाधिक रुग्ण सापडत असल्याने थेट केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही याची दखल घेतली आहे. गेवराई, आष्टी, पाटोदा आणि शिरूर तालुक्यांत वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने पुन्हा कडक निर्बंध लावले आहेत. मात्र लोक कोरोना संपल्याच्या अविर्भावात वागत असल्याने वाढती रुग्णसंख्या चिंतेची बाब बनत आहे.
--------------
नियमांना फाटा, प्रवस बिनधास्त
आष्टी, पाटोदा, शिरूर आणि गेवराई तालुक्यांमध्ये सकाळी ७ ते दुपारी १२.३० वाजेपर्यंतची आस्थापना सुरू ठेवण्याची वेळ लक्षात घेता, दुपारी १ नंतर केवळ अत्यावश्यक कारणांशिवाय हालचाल व शहरांतर्गत अथवा गावांतर्गत प्रवासाला परवानगी राहणार नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद आहे. तरीही या तालुक्यांमध्ये नियमांचा भंग करीत प्रवास केला जात असून, प्रशासनाला कठोर पाऊले उचलावी लागणार आहेत.
-------------