परळी (बीड ) : अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या विशेष पथकाने शुक्रवारी रात्री 12 च्या सुमारास परळी शहरात विक्रीसाठी आलेला २३ लाखांचा गुटखा पकडला. ही कारवाई शहरातील चेंबरी विश्रामगृहासमोर करण्यात आली. यावेळी गुटख्यासह ट्रक आणि चालकास ताब्यात घेण्यात आले. शनिवारी अन्न व औषध प्रशासन चे सहाय्याक आयुक्त कृष्णा दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी ऋषिकेश मरेवार हे बीड हुन परळीत दाखल झाले असून पंचनाम्याची कारवाई सुरू आहे.
शुक्रवारी रात्री अपर पोलीस अधीक्षक भोर यांचे विशेष पथक परळी शहरातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना एमएच ४४ - ९०८६ या क्रमांकाच्या ट्रकमधे गुटखा असून तो परळी शहरात विक्रीसाठी उतरविला जाणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. सदर माहितीच्या आधारे पथकाने औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राजवळील पुलावर सापळा रचला. रात्री १२ वाजताच्या सुमारास सदरील ट्रक चेंबरी विश्रामगृहासमोरून जात असलेला पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांना दिसून आला. त्यामुळे त्यांनी ट्रक थांबवून झडती घेतली असता आतमधे राजनिवास कंपनीच्या गुटख्याच्या ९२ गोण्या आढळून आल्या. या गुटख्याची एकूण किंमत २३ लाख 50 हजार रूपये एवढी आहे. पोलिसांनी ट्रकचालक संदिप शिवाजी सिरसाठ (रा. तेलघणा, ता. अंबाजोगाई) याच्याकडे चौकशी केली असता त्याने हा गुटखा परळी शहरातील ईश्वरप्रसाद मुरलीधर लाहोटी यांचा असल्याचे सांगितले.
पोलिसांनी गुटख्यासह ट्रक आणि चालकास ताब्यात घेत संभाजीनगर पोलिसांच्या हवाली केला असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर अधीक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील पोलीस उपनिरिक्षक एस.यु. जाधव, कर्मचारी फड, घोलप, तानाजी तागड यांच्या पथकाने केली.