बीड : तालुक्यातील पोखरी (लिंबा) येथे जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शाळा असून या शाळेच्या नूतन इमारतीसाठी लोकसहभागातून २५ लाख रुपये जमा झाले.
पोखरी येथील या शाळेसाठी फक्त पाच खोल्या आहेत. त्या सर्व शाळा खोल्या जुन्या असून, जीर्ण झालेल्या आहेत. या शाळेच्या इमारतीसाठी मोठया प्रमाणावर निधीची गरज आहे. शासनाच्या निधीची प्रतीक्षा न करता, आपल्या गावातील मुलामुलींना शिक्षणासाठी शाळेची सुंदर व सुव्यवस्थित इमारत असली पाहिजे या हेतूने प्रेरित होऊन ग्रामस्थांनी बैठक घेतली.
या बैठकीत लोकसहभागातून शाळेची इमारत बांधण्याचा संकल्प केला. पाटोदा तालुक्यातील जरेवाडी या गावास भेट देऊन तेथील ग्रामस्थांनी लोकसहभागातून बांधलेल्या शाळा इमारत कामाची प्रेरणा घेत पोखरी (लिंबा) येथील ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला.
पोखरी (लिंबा) येथे काल बंकट स्वामी मठाचे मठाधिपती लक्ष्मण महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली. या वेळी ग्रामस्थांनी या संकल्पाची माहिती उपस्थित पाहुण्यांना देत सार्वजनिक केली. ग्रामस्थांच्या वतीने या शाळा इमारत बांधकामासाठी २५ लाख रूपये वर्गणी जमा करण्यात आली आहे. या निधीमध्ये शिवसंग्रामचे प्रदेश युवक अध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी एक लक्ष रूपायांचा निधी जाहीर केला.
जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, शिक्षणाधिकारी भगवानराव सोनवणे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या लोकसभागातून उभारल्या जाणाऱ्या शाळा इमारतीचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. या सामाजिक उपक्रमासाठी गावचे सरपंच, बाबासाहेब खिल्लारे, शिवसंग्रामचे दादासाहेब खिल्लारे, शिक्षक फाळके यांनी पुढाकार घेतला आहे.