माजलगावात बारदाण्याअभावी ५ हजार क्विंटल हरभरा उघड्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 04:40 PM2018-05-21T16:40:23+5:302018-05-21T16:40:23+5:30
शासनाने सुरु केलेल्या हमी भाव केंद्रावर बारदाणा उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांचा ५ हजार क्विंटलपेक्षा जास्त हरभरा खरेदी अभावी उघड्यावर पडून असल्याने अवकाळीच्या भितीने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.
माजलगाव (बीड ): शासनाने सुरु केलेल्या हमी भाव केंद्रावर बारदाणा उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांचा ५ हजार क्विंटलपेक्षा जास्त हरभरा खरेदी अभावी उघड्यावर पडून असल्याने अवकाळीच्या भितीने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.
तालुक्यात हरभरा उत्पादनात वाढ झाल्याने शासनाने नाफेडच्या माध्यमातून माजलगाव बाजार समितीकडून येथील टीएमसी आवारात २४ एप्रिलपासून ४४०० रुपये या हमीभावाने हरभरा खरेदी सुरु करण्यात आली. हे खरेदी केंद्र १४ मे पासून शेतकऱ्यांचा माल घेण्यास बारदाणा नसल्याने बंद असून शेकडो शेतकऱ्यांनी आपला माल टीएमसी शेडमध्ये जागा नसल्याने उघड्यावर ठेवलेला आहे. त्यामुळे सध्या सुरु असलेल्या वादळी वाऱ्याने मात्र हरभरा भिजतो की काय? या भितीने त्यांचा जीव टांगणीला लागला असून, यावर तात्पुरते प्लास्टिक झाकले आहे.
रोज सुटत असलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने हे सर्व उडून जात असल्याने शेतकऱ्यांसह कर्मचाऱ्यांची धांदल उडत आहे. पावसाने आलेला हरभरा भिजतो की काय? ही भिती त्यांना सतावत आहे. या केंद्रावर २० दिवसांच्या कालावधीत आॅनलाईन पद्धतीने ३१० शेतकऱ्यांचा ४ हजार ४८८ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे. तर ५ हजार क्विंटलपेक्षा जास्त हरभरा परिसरात उघड्यावर पडून असल्याने अनेक शेतकऱ्यांचे पूर्व मशागतीची कामे पैशाअभावी खोळंबली आहेत. तातडीने उपाययोजनेची मागणी होत आहे.
वादळ, वाऱ्याची धास्ती
येथील टीएमसी आवारात शेडही उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना उघड्यावर तूर ठेवावी लागत आहे. तर ५ हजार क्विंटलपेक्षा जास्त हरभरा पडून आहे. सध्या वादळी वारा व पावसाचा अंदाज असल्याने शेतकरी या उघड्यावरील हरभऱ्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
१४ मेपासून झाली हरभरा खरेदी बंद
बाजार समितीच्या खरेदी केंद्रावर ५ ते ६ हजार क्विंटल हरभरा बारदाण्याअभावी खरेदी करता येत नसून लवकरच बारदाणा उपलब्ध करुन खरेदी सुरु करण्यात येईल.
- नीळकंठ भोसले,उपसभापती बाजार समिती
गोदाम उपलब्ध नाही
टीएमसी शेडमध्ये यापूर्वी खरेदी केलेली तूर पडून असल्याने हरभरा नाईलाजाने बाहेर ठेवावा लागत आहे. तुरीसाठी गोदाम उपलब्ध होताच हरभरा सुरक्षित ठिकाणी ठेवला जाईल.
- एच.एन.सवने, प्र.सचिव बाजार समिती