प्रवासात मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीला ५ वर्षे कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 11:55 PM2019-07-20T23:55:55+5:302019-07-20T23:56:25+5:30
अल्पवयीन मुलगी तिच्या गावी जाताना चारचाकी वाहनात छेडछाड केल्याप्रकरणी आरोपीला ५ वर्षे कारावास आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष जिल्हा व सत्र न्या. नाझेरा शेख यांच्या न्यायालयाने सुनावली.
बीड : अल्पवयीन मुलगी तिच्या गावी जाताना चारचाकी वाहनात छेडछाड केल्याप्रकरणी आरोपीला ५ वर्षे कारावास आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष जिल्हा व सत्र न्या. नाझेरा शेख यांच्या न्यायालयाने सुनावली.
गेवराई तालुक्यातील मुदापुरी येथील मुलगी शिकवणीसाठी गेवराईत आली होती. तिला व तिच्या मैत्रीणीला घरी नेण्यासाठी चुलते कार घेऊन आले होते. १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मुदापुरीकडे जाताना मोंढा नाक्यावर गावातील निवास उर्फ पप्पू गिरे व त्याचे वडील शंकर चारचाकी वाहनात बसले. या वाहनात आधीच बसलेल्या सदर मुलीची छेड काढून निवास गिरे याने लज्जास्पद कृत्य केले. त्यानंतर तिला व तिच्या वडिलांना जिवे मारण्याची धमकी दिली. पीडित मुलीने आरोपी हा पुन्हा अशी घटना करु शकतो हा विचार करुन गेवराई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला. तपासी अंमलदार एस. व्ही पवार यांनी सविस्तर तपास करुन आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
या प्रकरणाची सुनावणी विशेष जिल्हा व सत्र न्यायालयात झाली. सरकारी पक्षाच्या वतीने ६ साक्षीदार तपासण्यात आले. पीडित मुलगी व इतर कागदोपत्री पुरावा, सहायक सरकारी अभियोक्ता बी. एस. राख यांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन विशेष जिल्हा व सत्र न्या. नाझेरा शेख यांनी आरोपी निवास गिरे यास कलम ८ बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार ५ वर्षे सश्रम कारावास आणि १० हजार रुपये आणि कलम ५०६ भादंविनुसार १ वर्ष सश्रम कारावास आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अभियोग पक्षातर्फे सहायक सरकारी वकील बी. एस. राख यांनी काम पाहिले. त्यांना जिल्हा सरकारी वकील अजय राख यांनी मार्गदर्शन केले. या प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून सहायक फौजदार धनवडे, पो. हे. कॉ. एस. डी. जाधव, महिला पो. शिपाई सिंगल यांनी सहकार्य केले.