३६ किलोमीटरच्या रस्त्याला ८६ कोटींचा निधी, दर्जा मात्र सुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:25 AM2021-05-29T04:25:46+5:302021-05-29T04:25:46+5:30

नृसिंह सूर्यवंशी घाटनांदूर : येथून जाणाऱ्या परळी, घाटनांदूर, फावडेवाडी रस्त्याचे भूमिपूजन खुद्द पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केल्यानंतर आपल्या भाषणात ...

86 crore for 36 km road, but the quality is about | ३६ किलोमीटरच्या रस्त्याला ८६ कोटींचा निधी, दर्जा मात्र सुमार

३६ किलोमीटरच्या रस्त्याला ८६ कोटींचा निधी, दर्जा मात्र सुमार

नृसिंह सूर्यवंशी

घाटनांदूर : येथून जाणाऱ्या परळी, घाटनांदूर, फावडेवाडी रस्त्याचे भूमिपूजन खुद्द पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केल्यानंतर आपल्या भाषणात रस्ता दर्जेदार करण्याची तंबी देऊनही संबंधित कंत्राटदार मनमानी करीत असून, फक्त रस्त्याच्या कडेच्या साईड पट्ट्या भरून मधला रस्ता न उकरता त्यावर मुरूम व खडी टाकून लिपापोती करण्याचा उद्योग चालविला आहे. या ३६ किलोमीटरच्या रस्ता कामासाठी तब्बल ८६ कोटी रुपयांचे बजेट असून, संगनमताने निकृष्ट दर्जाचे काम पूर्ण करण्यात येत आहे.

महाराष्ट्र रस्ते सुधार योजनेतून ८६ कोटी रुपयांच्या परळी-फावडेवाडी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला. हे काम पुणे येथील डीपीजे कन्स्ट्रक्शन नामक खाजगी कंत्राटदार करीत आहे. ते बीड जिल्ह्यातील बड्या राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याचे जावई असल्याने मनमानी पद्धतीने रोडचे काम पूर्ण करीत आहेत. घाटनांदूरमधून चोपनवाडी, पिंप्री, फावडेवाडीकडे गेलेल्या या रस्ता कामात फक्त दोन्ही बाजूची साइडपट्टी भरून मधला रस्ता बॉक्स न उकरता आहे तसाच ठेवून त्यावर मातीमिश्रित मुरूम भरून खडी टाकून दबाई करण्यात येत आहे. या भागात मोठ्या प्रमाणात जमिनीत काळ्या मातीचा थर असल्याने रस्त्याचे काम किमान अर्धा मीटर खोल खोदून मुरूम खडी भरून दबाई करणे आवश्यक आहे. मात्र, कंत्राटदार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून निकृष्ट पद्धतीने काम करून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत आहे.

पिंप्री ग्रामस्थांची तक्रार

एकदा रोड पूर्ण झाला तर तब्बल पंधरा ते वीस वर्षे यावर एक छदामही खर्च होणार नाही. पालकमंत्र्यांनी मतदारसंघातील कामाकडे लक्ष देण्याची गरज आहे. या रस्ता कामाबाबत पिंप्री गावचे माजी सरपंच पाराजी कातकडे, उपसरपंच बालासाहेब डोंगरे यांनी लेखी निवेदनाद्वारे संबंधितांकडे तक्रार दिली आहे.

अधिकारी म्हणतात,

अंबाजोगाई सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पी. सी. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आमची केवळ देखरेख असून, या रोडसाठी नोडल एजन्सी क्वालिटी कंट्रोलचे संतोष बोबडे यांच्याशी संपर्क साधण्याचा सल्ला ‘लोकमत’शी बोलताना दिला, तर नोडल एजन्सीचे संतोष बोबडे यांना विचारले असता त्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून काही ठिकाणी सुधारणा करण्याचा सल्ला दिला असल्याचे ‘लोकमत’ला सांगितले.

===Photopath===

280521\20210524_143901_14.jpg

Web Title: 86 crore for 36 km road, but the quality is about

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.