धारूर: धारुर तालुक्यातील धुनकवाड येथील शेतकरी विक्रम प्रल्हाद यादव यांच्या रिटा येथील शेतात गायी बैल बांधलेले असतात. मंगळवारी रात्री येथे बिबट्याने हल्ला करून वासराचा फडशा पाडला. गेल्या काही महिन्यांपासून या भागात बिबट्याचा वावर असल्याची चर्चा होती. यातच आता शेतातील जनावरांचा फडशा पडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
काही दिवसांपूर्वी पहाडी दहिफळ येथे एका वासराचा बिबट्याने फडशा पाडला होता. अनेक शेतकऱ्यांच्या नजरेस बिबट्या पडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.परंतु काही दिवसानंतर ही चर्चा बंद झाली. मात्र, मंगळवारी पुन्हा बिबट्याने गायीच्या वासराचा फडशा पाडल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
धारुर तालुक्यातील पहाडी दहिफळ, धुनकवाड व पहाडी पारगाव शिवारात कुंडलीका धरणामुळे ऊसाचे क्षेत्र वाढले आहे. येथे लपण्यासाठी बिबट्यास जागा आहे. यामुळे येथे बिबट्याचा वावर वाढला आहे. सध्या उसतोडणी सुरू असल्याने मंजुरांमध्ये प्रचंड भिती निर्माण झाली आहे. याकडे वनविभागाने लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होते आहे.