एसीबीचे अधिकारीच अडकले ट्रॅपमध्ये; दोघांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2021 06:13 PM2021-06-15T18:13:48+5:302021-06-15T18:17:05+5:30
ACB officials trapped in trap ‘लोकमत’ने केली होती बातमी : महासंचालक व अधीक्षकांच्या चौकशीनंतर बीड शहर ठाण्यात गुन्हा दाखल
बीड : एसीबीमध्ये कार्यरत असताना सापळ्यात अडकलेल्या एका शाखा अभियंत्याला लाच मागितल्याच्या प्रकरणात बीड एसीबीचा तत्कालीन पोलीस निरीक्षक राजकुमार पाडवी याच्यासह त्याचा तत्कालीन रायटर प्रदीप वीर या दोघांनी लाचेची मागणी केली. याची तक्रार एसीबीचे पोलीस महासंचालक व औरंगाबाद परिक्षेत्र विभागाचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे करण्यात आली होती. त्यांनी चौकशी केल्यानंतर लाच मागितल्याचे सिद्ध झाल्यानंतर बीड शहर पोलीस ठाण्यात राजकुमार पाडवी व प्रदीप वीर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला आहे.
बीडच्या एसीबीने एप्रिलमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या शाखा अभियंत्याला एक हजाराची लाच घेताना पकडले होते. या प्रकरणात आरोपी शाखा अभियंता शेख समद नुर मोहम्मद याला मदत करण्यासाठी एसीबीचा तत्कालीन पीआय राजकुमार पाडवी याने दोन लाखांची लाच मागितली आणि त्यानंतर त्याचा रायटर प्रदीप वीर याने ५० हजारांत तडजोड केली होती. याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालक कार्यालयाकडे करण्यात आली होती. शेख समद याचा भाऊ जमिलोद्दीन शेख यांनी ही तक्रार दिली होती. या तक्रारीवर एसीबीच्या महासंचालक कार्यालयाने चौकशी केली. या चौकशीत लाचेची मागणी केल्याचे समोर आल्यानंतर सोमवार रोजी रात्री उशिरा एसीबी औरंगाबादचे पथक बीड शहरात दाखल झाले. या पथकाने राजकुमार पाडवी आणि प्रदीप वीर याच्या विरोधातील बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई एसीबीचे प्रभारी अप्पर पोलीस अधीक्षक मारोती पंडित, पोलीस निरीक्षक विकास घनवट, पोलीस हवलदार राजेंद्र जोशी, मिलिंद इप्पर यांनी केली. राजकुमार पाडावी याची काही दिवसांपूर्वी बीडहून औरंगाबादला बदली झाली होती. त्यानंतर चार दिवसांपूर्वीच त्याची मुंबई येथे बदली झाली आहे, तर प्रदीप वीर याला यापूर्वीच एसीबीमधून जिल्हा पोलिसात परत पाठविण्यात आले आहे.
‘लोकमत’ने केले होते वृत्त प्रकाशित
‘बीडच्या लाचलुचपत विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यानेच मागितली लाखाची लाच’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने ६ मे रोजी वृत्त प्रकाशित केले होते. याच प्रकरणात तलाठी दादासाहेब आंधळे यांनी देखील तक्रार केली होती, तर, त्यांना २४० रुपये शासकीय शुल्क आकारलेले असताना देखील, एसीबीची कारवाई करण्याची धमकी देत १ लाखाची लाच मागितली होती. याची तक्रार सुरुवातीला बीड एसीबीकडे केली होती. मात्र, त्यांच्याकडून कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्याकडे २९ एप्रिल २०२१ रोजी तक्रार करण्यात आली होती. तसेच शाखा अभियंत्याने देखील पुराव्यासह तक्रार केली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
‘एसीबी’चा लावला ट्रॅप
शाखा अभियंत्यावर २ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी कारवाई केल्यानंतर बचावासाठी २ लाखांची मागणी केली होती. मात्र, त्यासंदर्भातील सर्व ऑडिओ क्लिप तक्रारीसोबत सादर करण्यात आली होती. त्याआधारे दीड महिन्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहमदनगर यांनी चौकशी केली, त्यात हे दोघेही दोषी आढळून आले होते. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.