सोमनाथ खताळ ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : सर्वसामान्यांना प्रत्येक पावलावर महसूल विभागामध्ये काम करण्यासाठी जावे लागते. परंतु येथील अधिकारी, कर्मचारी पैसे घेतल्याशिवाय कामे करीत नसल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या कारवायांवरून सिद्ध झाले आहे. गत १६ महिन्यांच्या कालावधीत महसूल विभागाचे तब्बल १५ जण एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. लाच स्वीकारण्यात महसूल ‘टॉप’वर असल्याचे दिसून येते तर ग्रामविकास खाते दुस-या व पोलीस विभाग तिस-या स्थानी आहे. दरम्यान, नागरिकही तक्रार देण्यासाठी पुढे येत असल्याने एसीबीच्या कारवायांचा टक्का वाढल्याचे दिसते.
काम कुठलेही असो; ते पैशाशिवाय होत नाही असा समज आजही नागरिकांमध्ये आहे. त्याला एसीबीच्या कारवायांमुळे दिवसेंदिवस दुजोरा मिळत चाललेला आहे. सर्वसामान्य नागरिकांना छोटी - मोठी कामे करण्यासाठी रोज शासकीय कार्यालयाचे खेटे मारावे लागतात. मात्र, येथे आल्यावर अधिकारी व कर्मचारी मात्र टोलवाटोलवी करुन वेळेत कामे करण्यास प्राधान्य देत नाहीत. काही अधिकारी तर चक्क वेळेत व काम पूर्ण करण्यासाठी पैसे मागत असल्याचे दिसून येते. यावर काही सुजाण नागरिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करतात. एसीबीकडूनही तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तक्रारींची खात्री करीत कोणावरही अन्याय होणार याची काळजी घेतली जाते. एखाद्या शासकीय कर्मचारी वा अधिकाºयाने पैसे मागितल्याचे सिद्ध होताच एसीबीकडून सापळा लावला जातो. लाच स्वीकारताच झडप घालून त्याला बेड्या ठोकल्या जातात.
दरम्यान, गतवर्षी ३२ कारवाया झाल्या. यावर्षी ४ कारवाया वाढून तो ३६ वर पोहोचला आहे. विशेष म्हणजे यावर्षी जिल्हा पुरवठा अधिकारी एन. आर. शेळके, जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे, क्रीडा अधिकारी नानकसिंग बस्सी, सहायक पोलीस निरीक्षक अनंत जगताप, नायब तहसीलदार माधव काळे, जिल्हा उद्योग केंद्राचा महाव्यवस्थापक दिलीप फणसे, मत्स्य विकास अधिकारी बबन तुंबारे असे अनेक बडे मासेही एसीबीच्या गळाला लागले.
लाचखोरीत महसूल विभाग टॉपवर असला तरी इतर विभागही मागे नाहीत. ग्रामविकास विभागातही १३ कारवाया झाल्या आहेत. पोलीस विभागात बीड ग्रामीणच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अनंत जगताप सह पाच कारवाया केल्या असून, यात सहा लोकांचा समावेश आहे. महसूलमध्ये १५ लाचखोर आहेत. क्रीडा विभागात जिल्हा क्रीडा अधिकारी खुरपुडे, बस्सी यांच्यासह एका शिपायाचा समावेश आहे. कृषी विभागातही अंबाजोगाईच्या तालुका कृषी कार्यालयात सतीश सुरवसे यालाही हजार रुपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. उद्योग खात्यामध्ये दिलीप फणसे या महाव्यवस्थापकाला तीन हजार रुपयांची लाच घेताना बेड्या ठोकल्या होत्या.
१६ महिन्यात ४० कारवायांमध्ये ५३ कर्मचारी, अधिकाºयांसह खासगी इसम एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. पोलीस अधीक्षक श्रीकांत परोपकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक बाळकृष्ण हनकुडे पाटील, पो. नि. गजानन वाघ, अर्चना जाधव, पो.हे.काँ. दादासाहेब केदार, अशोक ठोकळ, बापूसाहेब बनसोडे, विकास मुंडे, अमोल बागलाने, राकेश ठाकूर, कल्याण राठोड, मनोज गदळे, प्रदीप वीर, सय्यद नदीम, म्हेत्रे हे कारवाया करीत आहेत.चौकशीमध्ये सहकार्य अपेक्षितलाच स्वीकारण्यानंतर एसीबीकडून संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचाºयांची चौकशी केली जाते. आरोपीविरुद्ध पुरावे जमा केले जातात. परंतु काही लोक एसीबीला सहकार्य करीत नाहीत. त्यामुळे पुरावे जमा करण्यात अडचणी येतात. चौकशीस सामोरे जाऊन लाचखोरांना शिक्षा होण्यासाठी सहकार्य करण्याची गरज आहे.
तक्रारदार वाढलेएसीबीकडून जनजागृती सप्ताह राबविला जातो. याचा फारसा फरक पडत नसला तरी प्रत्येक शासकीय कार्यालयात ठिकठिकाणी लाच स्वीकारणे व देणे गुन्हा असल्याचे फलक लावले. त्यामुळे नागरिक जागरुक झाले असून, लाचेची मागणी करताच ते एसीबीकडे धाव घेत आहेत.