ऊसतोड मजूरावर काळाचा घाला; गावाकडे परतत असताना करमाळ्याजवळ अपघाती मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 06:28 PM2021-03-10T18:28:38+5:302021-03-10T18:29:25+5:30
टेंभूर्णी करमाळा गावानजीक दोन मोटार सायकलींची समोरासमोर जोराची धडक झाली.
आष्टी : तालुक्यातील ऊसतोड कामगार हे ऊसतोडणीसाठी इतर राज्यात कामासाठी जात असतात सध्या कारखान्याचा ऊसतोडणी हंगाम संपला असून ऊसतोड मजूर गावाकडे येत आहेत.तालुक्यातील पांगुळगव्हाण येथील नानासाहेब बाबासाहेब गिते ( ४० ) हे गावाकडे परतत असताना सोलापूर जिल्ह्यातील करमाळा गावाजवळ अपघात होऊन मृत्यू झाल्याची घटना दि.९ मार्च रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास घडली आहे.
आष्टी तालुक्यातील पांगुळगव्हाण येथील नानासाहेब बाबासाहेब गिते हे ऊसतोडणीसाठी आपल्या कुटुंबासमवेत दि सासवड माळी शूगर लि.माळीनगर ( ता. माळशिरस जि.सोलापूर ) या कारखान्यावर गेले होते. कामाचा पट्टा पडल्याने ते दुचाकीवरुन ( क्रं.MH 23 2013 ) गावाकडे परतत होते. टेंभूर्णी करमाळा गावानजीक दोन मोटार सायकलींची समोरासमोर जोराची धडक झाली. यात नानासाहेब गीते गंभीर जखमी झाले. करमाळा येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर अहमदनगर येथे अधिक उपचारासाठी घेऊन जात असताना वाटेतच त्यांचा मृत्यू केला. त्यांच्या पार्थिवावर आज बुधवारी सकाळी ९ वाजता पांगुळगव्हाण येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.