बीड : शहराजवळच असलेल्या पाली येथील आनंदग्राम संस्थेत दोन मुलींचे कन्यादान होणार आहे. तसेच एका परित्यक्त्या महिलेचाही पुनर्विवाह शनिवारी दुपारी १२.३० वाजता होणार आहे. हे जोडपे एचआयव्ही पॉझिटिव्ह असून त्या सर्वांचे पालकत्व सामाजिक कार्यकर्ते व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्वीकारले.
एचआयव्हीबाधित मुले, महिला, पुरुषांचा सांभाळ करण्यासाठी संध्या व दत्ता बारगजे या दाम्पत्याने पाली येथे आनंदग्राम ही संस्था उभारली. याच संस्थेत मागील १० व ३ वर्षांपूर्वी दोन मुली आल्या. दोघींनाही आई-वडील नव्हते. बाधित असल्याने त्यांना कोणी स्वीकारलेही नाही. त्यांना आधार देण्याबरोबरच त्यांच्या संसाराचीही जबाबदारी आनंदग्रामने घेतली. बुलडाणा व बीड जिल्ह्यातीलच बाधित दोन तरुणांनी लग्नाची इच्छा व्यक्त केली व दोघांचेही मने जुळली. आता या दोघींचे कन्यादान सामाजिक कार्यकर्ते व प्रशासकीय अधिकारी करणार आहेत. तशा लग्नपत्रिकाही प्रकाशित केल्या आहेत. तीन वर्षांपूर्वी विवाह होऊन गर्भवती असलेल्या महिलेला एचआयव्हीची लागण झाली. पतीनेही सोडून दिले. त्यामुळे ती आनंदग्राममध्ये आली. याच संस्थेत नांदेड येथीलही एक व्यक्ती आला होता. दोघांनीही एकमेकांशी लग्नाची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे त्यांचाही पुनर्विवाह होणार आहे.
आतापर्यंत झाले ६ विवाह आनंदग्राम संस्थेत वाढलेल्या सहा मुलींचे आतापर्यंत विवाह लावण्यात आलेले आहेत. त्यांचे संसार सध्या सुखाने सुरू असल्याचे संध्या व दत्ता बारगजे यांनी सांगितले. आता ही संख्या आठ होऊन एका पुनर्विवाहाचीही नोंद झाली आहे. १८ वर्षे पूर्ण झालेल्या आणखी ३ मुली असून १४ ते १६ वयोगटातील १२ मुली असल्याचेही ते म्हणाले.
चिमुकलीचा नामकरण सोहळायाच संस्थेतील बाधितांची मुलगी निगेटिव्ह जन्माला आली. तिचा नामकरण सोहळाही पार पडणार आहेत. तसेच पॉझिटिव्ह दाम्पत्याची मुलेही निगेटिव्ह जन्माला येऊ शकतात. अशीच एक यशस्वी कथा असलेले ‘जन्म एका दिव्याग्नीचा’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. संचालिका संध्या बारगजे यांनी याची मांडणी केल्याचे दत्ता बारगजे म्हणाले.