माजलगाव (बीड ) : येथील शहर पोलिस ठाण्याची महिला पोलिस ललिता साळवे हिला प्रदिर्घ संघर्षानंतर लिंगबद्दल करण्याची परवानगी पोलीस खात्याकडून आज देण्यात आली. पोलिस महासंचालकांच्या आदेशानुसार जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीधर यांनी परवानगीचे पञ ललीताला दिले. पोलिस महासंचालकांच्या या आदेशाने लवकरच ललीता ही ललीतकुमार होणार आहे.
माजलगाव शहर पोलीसात कार्यरत असलेल्या महिला पोलिस ललिता साळवेला गेल्या अनेक वर्षांपासून शरिरात होणाऱ्या हार्मोन्स बदलामुळे लिंगबदल करण्याची इच्छा होती. यासाठी तिने पोलिस खात्याकडे परवानगी मागितली होती. माञ, ललिता ही भरतीच्या वेळी महिला म्हणून भरती झाली असून लिंगबदल केल्यास पुरुष झाल्याने तिच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता होती. त्यामुळे ललिताने मुंबई उच्च न्यायालयात ॲड. अब्बास नक्वी यांच्या मार्फत याचिका दाखल केली होती.
शरिरात बदल करण्याचा नैसर्गिक अधिकार आसल्याने न्यायालयाने तिच्या लिंगबदलाला परवानगी दिली होती. माञ, गृहविभागात ही पहिलीच बाब आसल्याने तांञिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. ललिताच्या या मागणीमुळे पोलिस खात्यापुढे पेच निर्माण झाला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ असल्याने याबाबत सहानभुती पूर्वक विचार करण्याचे आदेश गृह विभागाला दिले.
मागिल महिन्यात तामिळनाडु राज्यातील एका तृतिय पंथीयाबाबतीत घेतलेल्या निर्णयाच्या आधारे पोलीस खात्याने ललिताला दिलासा देणारा निर्णय घेतला. या सर्व घडामोडीनंतर महासंचालक सतिष माथुर यांनी गृहविभागाचा हा आदेश बीड जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीधर यांना दिला. दरम्यान, या परवानगीचे पत्र मिळाल्यानंतर ललिता लिंगबदल शस्ञक्रियेसाठी मुंबईला रवाना झाली आहे. लिंगपरिवर्तनानंतर ललिताची आवडीची पोलीसदलातील नोकरी कायम राहणार असल्याने तिने मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, पोलीस महासंचालक सतिष माथूर, पोलीस अधिक्षक श्रीधर यांच्यासह संपूर्ण पोलीस दलाचे आभार व्यक्त केले.