जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर छावण्या तपासणीला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 12:31 AM2019-03-30T00:31:56+5:302019-03-30T00:32:54+5:30
दुष्काळी परिस्थितीमध्ये जनावरांना पुरेसे खाद्य व पणी मिळावे यासाठी बीड जिल्ह्यात मोठ्या जवळपास ९०० छावण्यांना मंजुरी देण्यात आली होती.
बीड : दुष्काळी परिस्थितीमध्ये जनावरांना पुरेसे खाद्य व पणी मिळावे यासाठी बीड जिल्ह्यात मोठ्या जवळपास ९०० छावण्यांना मंजुरी देण्यात आली होती. मात्र, मंजुरी मिळून देखील सुरू न केल्यामुळे कार्यवाही करत २६८ छावण्या बंद करण्यात आल्या आहेत. तसेच जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी चारा छावण्यांमधील गैरप्रकार टाळण्यासाठी नेमलेली पथके सतर्क झाली असून, तपासणीला वेग आला आहे.
चारा छावण्यांची संख्या वाढल्यामुळे यापूर्वी झाला तसा मोठा गैरप्रकार होईल, अशी चर्चा नागरिकांमधून होत होती. मात्र छावण्यांच्या तपासणीसाठी जिल्हास्तरावर भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आल्यामुळे गैरप्रकारास आळा बसणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या सक्त आदेशानंतर चारा छावणीसंदर्भात तहसील प्रशासन देखील खडबडून कामाला लागले आहे. याच कारणामुळे मंजुरी दिलेल्या छावण्या सुरु न करण्यात आल्यामुळे जवळपास २६८ चारा छावण्या बंद केल्या आहेत. तसेच कार्यरत नसलेल्या छावण्या बंद करण्याचे प्रस्ताव तहसील स्तरावर प्रलंबित असल्याची माहिती आहे. पुढील आठवड्यात सुरु न केलेल्या आणखी १५० छावण्या बंद होण्याची शक्यता आहे.
ज्या छावण्यांध्ये जनावरांची संख्या ३०० पेक्षा कमी आहे अशा छावण्या देखील बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सुरु असलेल्या जनावरांची संख्या योग्य प्रकारे तपासूनच अहवाल देण्याचे देखील जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. छावणीमधील जनावरांची संख्या दिलेल्या आठवडी अहवालापेक्षा कमी असल्याचे भरारी पथकाला आढळून आले तर संबंधित तलाठी, ग्रामसेवक व अधिकारी यांच्यासह छावणी चालकावर कायदेशीर तसेच दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे देखील जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
जनावराला लावणार बारकोड
छावणीमध्ये भ्रष्टाचार करण्यासाठी जनावरांची संख्या अधिक दाखणे हा पर्याय असतो. याला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व छावण्यांवरील जनावरांना डिजिटल बारकोड लावण्यात येणार असून, त्याचे थेट प्रक्षेपण हे जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे. त्यामुळे ज्यावेळी शंका येईल त्यावेळी त्या ठिकाणी असलेली जनावरे तपासता येणार आहेत. ही प्रणाली पुढील आठवड्यापासून अंमलात आणण्याचे काम सुरु करण्यात येणार आहे.