कडा : उद्घाटनाला वर्ष उलटले तरी जागेच्या वादामुळे कडा बसस्थानकाच्या कामाला मुहूर्त लागत नसल्याने महिला, मुली व प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर कुचबंणा होत आहे.
मराठवाडय़ाचे प्रवेशद्वार व दिवसभरात दोनशेहुन अधिक बसेसची ये जा असलेल्या कडा बसस्थानकाला उतरती कळा आली होती. आणि सोयीसुविधा नसल्याने नवीन बसस्थानक व्हावे जनतेची मागणी होती. हा प्रश्न मार्गी लागला मंजुरी मिळाली. उद्घाटन झाले, एक कोटी चाळीस लाख रूपये खर्चाला कार्यारंभ आदेश मिळाला. जागेचे मार्कआऊट केले. पण नेमकी जागा ग्रामपंचायती की राज्य परिवहन महामंडळाची हा वाद मिटत नसल्याने वर्ष उलटून गेले तरी कामाला मुहूर्त अद्याप लागलेला नाही.
आष्टी तालुक्यातील कडा येथे बीड नगर राष्ट्रीय महामार्गावर बसस्थानक आहे. अनेक वर्षांपासून बसस्थानक असल्याने आता ती जागा अपुरी पडत असून सोयीसुविधा मिळत नसल्याने जनतेच्या रेट्यामुळे २०१८ मध्ये नवीन बसस्थानक मंजूर झाले. २०१९ ला उद्घाटन झाले. पण तेव्हापासून ग्रामपंचायत व एस. टी. महामंडळात जागा कोणाचा असा वाद सुरू झाला. ग्रामपंचायत व महामंडळ दोघेही आमचीच जागा असल्याचा दावा करत असल्याने ती जागा नेमकं कोणाची हे अजुनही समजले नाही. त्यामुळे जवळपास दीड कोटी रूपये खर्चून शहरांच्या वैभवात भर घालणाऱ्या या नियोजित बसस्थानकाच्या कामाला आडकाठी निर्माण झाली आहे. सध्या या ठिकाणी कसलीच सोय नाही. प्रवाशांना उघड्यावरच नैसर्गिक बसत असल्याने मोठ्या प्रमाणावर कुचंबणा होत आहे. शहराच्या वैभवात भर पडत असेल तर लवकरात लवकर जागेचा वाद मिटवुन बसस्थानकाच्या कामाला सुरुवात करावी अशी मागणी शिवसंग्राम तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी यांनी केली आहे.
याबाबत आष्टी येथील आगार प्रमुख संतोष डोके यांना विचारणा केली असता कडा बसस्थानकाच्या जागेचा वाद सुरू असल्याने बसस्थानकाचे काम बंद असल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले. तर जागेच्या वादाचा विषयच येत नाही. महामंडळाने त्यांना ठरवून दिलेल्या ६१ गुंठा जागेत बसस्थानकाचे काम सुरू करावे असे कडा येथील ग्रामविकास अधिकारी आबासाहेब खिलारे म्हणाले.