बीड : अक्षय तृतीयेला वाढती मागणी लक्षात घेत बाजारात आंब्याने चांगलाच भाव खाल्ला. मंळवारपासून आंब्याचे भाव १०० ते १५० रुपये किलो होते. त्यामुळे ग्राहकांनाही आखडता हात घ्यावा लागला. आवश्यक तेवढेच आंबे खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल राहिला.
अक्षय तृतीयेपासून लोक आंबे खाण्यास प्रारंभ करतात. बाजारात त्याआधी जरी आंब्याची उपलब्धता झाली तरी हौशी ग्राहकच ते खरेदी करतात. मागील वर्षी २८ एप्रिल रोजी तर या वर्षी दहा दिवस आधी १८ एप्रिल रोजी अक्षय तृतीयेचे पर्व साजरे झाले.या वर्षी आंब्याचे उशिरा आगमन झाले. आवक साधारण होती. अक्षय तृतीयेच्या अनुषंगाने व्यापाऱ्यांनी आंबे खरेदी केले. तसेच द्राक्षांचा मौसम संपल्याने आंबे खरेदीसाठी व्यापारी संख्या वाढली. उत्पादन कमी असल्याने बाजारात आंब्याची आवक कमी आहे. त्यात मागणी वाढल्याने आंध्र प्रदेश, कर्नाटकातील ठोक बाजारात आंब्याचे भाव वधारले.
आंध्र, गुजरात, कर्नाटकातून २५ टन आवकबीडच्या बाजारात अक्षय तृतीयेसाठी २५ टन आंब्याची आवक झाली होती. कर्नाटकमधून लालबाग तर आंध्रातील जकतियाल येथील मंडईतून दशेरी, बदाम तसेच गुजरातमधून केशर व रत्नागिरी येथून हापूस आंबा दाखल झाला.कलमी आंब्यांवरच हौस भावावी लागत आहेत. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यातील काही भागात आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. गावरान आंबा येण्यास अवधी असला तरी उत्पादन कमी राहण्याची शक्यता आहे.बाजारात बदाम आंबा ६० ते ७० रुपये, दशेरी, लालबाग १२० ते १४०, केशर १४० ते १५० तर रत्नागिरी हापूस आंबा ४०० ते ५०० रुपये डझनप्रमाणे विकले.
आठवड्यानंतर भाव कमी होतीलमुख्य बाजारपेठेतच तेजीव चोहोकडून मागणी वाढल्याने वाहतूक व इतर खर्च पाहता यावेळी आंब्याचे भाव वाढले आहेत. पुढच्या आठवड्यानंतर आवक वाढण्याची शक्यता असून भाव ग्राहकाच्या आवाक्यात राहतील.- हरुन अब्बास बागवान, फळांचे ठोक व्यापारी, बीड.
तरीही उत्साहाने खरेदीमागील वर्षी आंब्याची आवक जास्त होती. त्यामुळे भाव कमी होते. यंदा मागणी जास्त व कमी आवकीमुळे भाव काही प्रमाणात वाढले आहेत. तरीही ग्राहकांनी उत्साहाने आंबे खरेदी केले. हापूस, केशरला मागणी होती.- नाजोद्दीन बागवान, किरकोळ विक्रेता, बीड.