बीडमध्ये अंगणवाडी सेविकांचा छत्री मोर्चा; शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा आणि वेतन भत्त्याची केली मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 05:57 PM2019-08-03T17:57:31+5:302019-08-03T17:59:22+5:30
शासनाच्या धोरणाचा निषेध करत मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी
बीड: अंगणवाडी कर्मचार्यांना शासकीय कर्मचार्यांचा दर्जा देऊन सेविकांना तृतीय व मदतनिसांना चतुर्थ श्रेणी चे वेतन भत्ते सेवेचे फायदे तसेच किमान वेतन इतके महिन्याला मानधनाची रक्कम द्यावी, सप्टेंबर 2018 पासून मध्यवर्ती सरकारची मानधनवाढीची रक्कम फरका सहित द्यावी,सेवा निवृत्तीच्या वेळी मिळत असलेल्या मानधनाची 50 टक्के रक्कम पेन्शन म्हणून द्यावी , जून महिन्याच्या मानधनाची रक्कम अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देऊन त्यांची व त्यांच्या कुटुंबीयांची होणारी उपासमार थांबवावी या व इतर मागण्यांसाठी शनिवारी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने जिल्हा परिषदेवर छत्री मोर्चा काढण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या आवारात आंदोलक महिला कर्मचाऱ्यांनी शासनाच्या धोरणाचा निषेध करत हक्काच्या मागण्यांसाठी घोषणाबाजी केली. 'या सरकारचं करायचं काय खाली मुंडकं वर पाय' "मुख्यमंत्री हाय हाय' आमच्या मागण्या मान्य करा आधी घोषणा यावेळी देण्यात आल्या. या आंदोलनात राज्य कर्मचारी संघाचे उपाध्यक्ष सूर्यमणी गायकवाड संध्या मिश्रा, अनुसया वायभसे ,वृंदावनी कदम, ज्योत्सना नानजकर, करुणा पोरवाल, सिंधू घोळवे , इरफान शेख, महानंदा मोगरकर, सुमन आहेर आदींच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या आवारात प्रचंड घोषणाबाजीने परिसर दणाणला होता. यावेळी सूर्यमनी गायकवाड संध्या मिश्रा, अनुसया वायभसे आदींनी भाषणे केली मोर्चात सहभागी अंगणवाडी कर्मचारी महिलांनी छत्री काढून घोषणाबाजी केली. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या या मोर्चाची दखल घेण्यासाठी मात्र एकही वरिष्ठ अधिकारी यावेळी जिल्हा परिषद उपस्थित नव्हता त्यामुळे घोषणाबाजी सुरू होती.