जनावरांचे बाजार बंद; बैलजोडी खरेदीसाठी अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:22 AM2021-06-19T04:22:40+5:302021-06-19T04:22:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र आठवडी बाजार बंद केले होते. तसेच जनावरांचा बाजारही बंद केला होता;मात्र ...

Animal markets closed; Difficulty buying bullocks | जनावरांचे बाजार बंद; बैलजोडी खरेदीसाठी अडचण

जनावरांचे बाजार बंद; बैलजोडी खरेदीसाठी अडचण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबाजोगाई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र आठवडी बाजार बंद केले होते. तसेच जनावरांचा बाजारही बंद केला होता;मात्र आता निर्बंधांत शिथिलता मिळत असल्याने बहुतांश प्रमाणात व्यवहार सुरू झाले आहेत; मात्र जनावरांचा बाजार अजूनही सुरू झाला नाही. यामुळे ऐन पेरणीच्या दिवसांत बैल खरेदीसाठी शेतकऱ्यांना अडचण निर्माण होत आहे.

सध्या पेरणीचे दिवस असल्याने बैलांची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होते; मात्र कोरोनामुळे जनावरांचे बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांना बैल खरेदीसाठी व्यापाऱ्याच्या दावणीला गावोगावी फिरावे लागत आहे. तर व्यापाऱ्यांना सुद्धा बैल खरेदीसाठी खेडोपाडी हिंडून वाहनांतून बैल खरेदी करून दावणीला आणून बांधावे लागत आहेत; मात्र बैलांच्या किमती वाढल्यामुळे शेतकरी व्यापाऱ्यांच्या दावणीला जाऊनही ही भाववाढीमुळे खरेदी न करता रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. अंबाजोगाई येथे दर मंगळवारी जनावरांचा बाजार भरत असतो. या परिसरातील व इतर तालुक्यातील शेतकरी बाजारासाठी येत असतात. या बाजारात बैल, शेळी, गाय, म्हैस जनावरांचा बाजार भरतो; मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनावरांचा बाजार बंद झाल्यामुळे व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. मार्च महिन्यापासून शेतकरी नवीन बैलजोडी खरेदी करीत असतात. खरिपाच्या पेरणीसाठी अनेक शेतकऱ्यांकडे बैलच मिळत नसल्यामुळे पेरणी कशी करावी? असा प्रश्न आहे. त्यामुळे कोरोनाचा काळ कधी संपतो आणि जनावरांचा बाजार कधी भरतो. याकडे सध्या शेतकऱ्यांचे लागले आहे.

माझ्याकडे बैलजोडी नाही. त्यामुळे सध्या नवीन बैलजोडी घेण्यासाठी व्यापाऱ्यांच्या दावणीकडे जात आहे; मात्र भरमसाठ किमतीमुळेही बैलजोडी घेणे परवडत नाही; मात्र आता खरीप हंगामाच्या पेरणीसाठी बैलजोडी पाहिजे; मात्र बाजार बंद असल्यामुळे बैलजोडी मिळत नसल्याने शेतीचे काम कसे करावे? असा प्रश्न पडला आहे.

- शाम जगताप, मुडेगाव.

...

सध्या जनावरांचे बाजार बंद असल्यामुळे खरेदी-विक्री करण्याचा व्यापार बंद आहे. खेडोपाडी जाऊन काही बैल विकत घेऊन वाहनाद्वारे आणत आहे. त्यांचा चारा, पाण्याचा खर्च दावणीला बांधून करावा लागत आहे. यामुळे खर्च वाढत आहे. बैल मिळत नसल्याने किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी दावणीला बैल खरेदी करण्याकरिता येत असला तरी भाव वाढल्यामुळे शेतकरी रिकाम्या हाताने परत जात आहेत.

- शेख बाबालाल, बैल व्यापारी.

Web Title: Animal markets closed; Difficulty buying bullocks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.