राज्यात ७२७ वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियूक्ती आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 02:47 PM2019-08-10T14:47:27+5:302019-08-10T14:48:55+5:30
पीएचसीला ४६१ तर रूग्णालयात २६६ लोकांचा समावेश
बीड : महाराष्ट्रात आरोग्य विभागाच्या रिक्त जागांचा प्रश्न ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून निदर्शनास आणला होता. यावर आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. सुरूवातीला मुलाखती आणि आता ७२७ वैद्यकीय अधिकाऱ्यांना (गट अ) नियूक्तीचे आदेश दिले आहेत. पैकी काही अधिकारी रूजूही झाल्याचे सूत्रांनी सांगितले. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रात ४६१ तर इतर रूग्णालयांमध्ये २६६ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मराठवाड्याला २९२ एमओ डॉक्टर मिळाले आहेत.
राज्याच्या आरोग्य विभागात शिपायापासून ते संचालकांपर्यंतची पदे रिक्त असल्याने यंत्रणाच ‘आजारी’ पडली होती. यामुळे शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचत नव्हत्या. तसेच रूग्णांना आरोग्य सेवाही तत्पर मिळत नसल्याची ओरड होत होती. हाच धागा पकडून ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून राज्यातील रिक्त पदांचा प्रश्न निदर्शनास आणून दिला. त्यानंतर आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आणि तात्काळ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रखडलेल्या ८७७ जागांसाठी मुलाखती घेतल्या. याचे मुंबईत समुपदेशन केले. दोन टप्प्यात समुपदेशन झाले असून आतापर्यंत ७२७ वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियूक्ती आदेश दिले आहेत.
मिळालेले तज्ज्ञ व एमबीबीएसचा आकडा
एमबीबीएसच्या ४६५ डॉक्टरांसह भिषक १६, भूलतज्ज्ञ ३०, स्त्रीरोग तज्ज्ञ ६३, बालरोग तज्ज्ञ ६२, क्ष-किरण शास्त्रज्ञ ७, मानसोपचार तज्ज्ञ १०, पीएसएम २१, शल्य चिकित्सक ७, अस्थिव्यंग तज्ज्ञ २१, शरिरविकृती शास्त्रज्ञ ४, नाक-कान-घसा ४, त्वचारोग तज्ज्ञ २, रक्त संक्रमण अधिकारी १, नेत्र रोग १४ अशा तज्ज्ञांच्या जागा भरण्यात आलेल्या आहेत.
कोणत्या जिल्ह्यासाठी किती डॉक्टर
राज्यात ७२७ मध्ये ठाणे ३९, पालघर १५, रायगड २५, कोल्हापूर २२, सिंधुदुर्ग ६, रत्नागिरी ११, सांगली १६, पुणे ४४, सोलापूर २५, सातारा १४, नाशिक ३१, नंदुरबार २१, जळगाव ११, धुळे १९, अहमदनगर २६, औरंगाबाद ३३, जालना २९, परभणी २९, हिंगोली २१, लातूर ३९, उस्मानाबाद २४, बीड ७०, नांदेड ४७, अकोला १३, अमरावती ७, यवतमाळ ८, वाशिम १२, बुलढाणा २६, नागपूर २०, भंडारा ६, वर्धा २, गोंदिया ८, चंद्रपूर ५, गडचिरोली ३ असे अधिकारी मिळाले आहेत.
पदोन्नतीवरही सकारात्मक चर्चा
आरोग्य विभागातील कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या प्रश्नावरही लोकमतने आवाज उठविला होता. यावर तीन दिवसांपूर्वी प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यामध्ये पदोन्नतीच्या मुद्यावर सकारात्मक चर्चा करण्यात आली आहे. जिल्हा शल्य चिकित्सकपर्यंतच्या डॉक्टरांना पदोन्नती देण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे विश्वसनिय सूत्रांकडून समजते. पदोन्नतीची प्रक्रिया सुरू झाल्याने अधिकाऱ्यांमध्ये समाधान आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त जागांचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागला आहे. इतर जागाही भराव्यात. नियूक्ती आदेश मिळालेली काही अधिकारी अद्यापही रूजू झालेले नाहीत. ते रूजू झाल्यावर कामात काही प्रमाणात नक्कीच सुसूत्रता येईल.
- डॉ.राधाकृष्ण पवार ( अध्यक्ष, जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग संघटना महाराष्ट्र )