सशस्त्र चोरट्यांचा हल्ला, तीन लाखांचा ऐवज लुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:22 AM2021-06-10T04:22:46+5:302021-06-10T04:22:46+5:30
पाटोदा (जि. बीड) : शेतवस्तीवर राहणाऱ्या घरावर सशस्त्र आलेल्या चोरट्यांनी हल्ला करत एका कुटुंबातील तिघांना बेदम मारहाण केली. ...
पाटोदा (जि. बीड) : शेतवस्तीवर राहणाऱ्या घरावर सशस्त्र आलेल्या चोरट्यांनी हल्ला करत एका कुटुंबातील तिघांना बेदम मारहाण केली. नंतर चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील नगदी ५० हजार रुपयांसह कपाटातील व महिलांचे साडेसहा तोळे सोन्याचे दागिने असा अडीच ते तीन लाखांचा ऐवज लुटला. ही घटना पाटोदा तालुक्यातील चुंभळी येथे ८ जून रोजी रात्री घडली.
रवींद्र शहादेव सिरसाट (रा. चुंभळी, ता. पाटोदा) हे त्यांच्या उंबरविहीर रस्ता येथील शेतात आपल्या आई-वडिलांसह राहतात. रात्री साडेबाराच्या दरम्यान गोठ्यात झोपलेले शहादेव निवृत्ती सिरसाट यांना चोरट्यांनी दगडाने मारून जखमी केले. त्यावेळेस त्यांनी आरडाओरडा केला असता, शेजारच्या पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेला त्यांचा मुलगा रवींद्र बाहेर आला. त्यावेळी चोरट्यांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. यावेळी सिरसाट कुटुंबाला चाकूचा धाक दाखवत धमकावले व कपाटातील नगदी ५० हजार रुपये आणि दागिने काढून घेतले. चोरट्यांनी गोठ्यात झोपलेली रवींद्रची आई सखुबाई यांच्या डोक्यात गज मारून जखमी केले. यावेळी रवींद्र यांची पत्नी व सखुबाई यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावून घेतले. यामध्ये गंठण, दोन मणिमंगळसूत्र, एक नेकलेस, कानातील दोन जोड व इतर अशा दागिन्यांचा समावेश आहे.
चोरट्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले रवींद्र शहादेव सिरसाट यांच्यावर बीड शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती पाटोदा पोलिसांना मिळल्यानंतर रात्री तत्काळ त्याठिकाणी पोलिसांनी धाव घेऊन घटनेचा पंचनामा करून गुन्हा दाखल केला. ९ जून पहाटेपर्यंत पोलीस घटनास्थळावर थांबले होते. घटनेची माहिती मिळल्यानंतर आष्टीचे उपाधीक्षक विजय लगारे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि भारत राऊत, पाटोदा ठाण्याचे पोनि महेश आंधळे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तपास पाटोदा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करत आहे.
चुंभळी येथील घटनास्थळावर भेट देऊन पाहणी केली आहे. पाटोदा पोलीस ठाण्याचे एक व स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके चोरट्यांचा शोध घेत आहेत. लवकरच चोरट्यांना ताब्यात घेतले जाईल. - भारत राऊत, पथक प्रमुख, स्थानिक गुन्हे शाखा
===Photopath===
090621\09_2_bed_15_09062021_14.jpg~090621\09_2_bed_14_09062021_14.jpg
===Caption===
घरातील कपाटामधून सोने व नगदी ५० हजार केले लंपास ~सिरसाट यांच्या शेतातील गोठा व घर