बीड : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णवाढ वेगाने होत गेली. यात खासगी रुग्णालयातीलही उपचारासाठी वेटिंग असल्याने मोठ्या प्रमाणात रुग्णांच्या नातेवाईकांची लूट झाल्याची बाब पुढे आली होती. कोविड रुग्णालयांनी रुग्णांकडून आकारलेल्या देयकांचे लेखापरीक्षण सुरू असून, तब्बल १० लाख रुपये जादा बिल केल्याचे समोर आले आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. जवळपास ८८ हजार रुग्ण आढळून आले होते; तर २ हजारपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. रुग्णसंख्या वाढल्याने उपचारासाठी रुग्णालयात जागा मिळत नव्हती. त्यामुळे जिल्हाभरातील ७१ खासगी रुग्णालयांना कोरोना उपचार करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. या लाटेत रुग्णसंख्या वाढल्यामुळे सर्वच रुग्णालयात बेड फुल्ल झाले होते. त्यामुळे औरंगाबादसाठी उपचारासाठीदेखील अनेकांना जावे लागत होते. तर, अनेक खासगी रुग्णालयांनी अव्वाच्या सव्वा बिल रुग्णांकडून आकारले होते. त्यानंतर शासनाने अनेक निर्बंध घातले होते. त्यामुळे वाढलेले बिल अनेक रुग्णालयांनी कमी देखील केले होते.
तर, जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी जिल्ह्यात रुग्णालयांचे लेखापरीक्षण करण्यासाठी १७ पथके स्थापन केलि होती. या प्रत्येक पथकात ६ अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश होता. या सर्व पथकांकडून सर्व खासगी रुग्णालयांचे लेखापरीक्षण केले जात आहे. तर, काही रुग्णांच्या नातेवाईकांनी जास्तीचे बिल आकारल्याच्या तक्रारी केल्यानंतर त्यांचे समाधानदेखील पथकातील अधिकाऱ्यांकडून करण्यात आले. जवळपास १० लाख रुपयांची वाढीव रक्कम प्रशासनाच्यावतीने नातेवाईकांना परत केली जाणार आहे. तर, रुग्णांचे वाढीव बिल आकारणाऱ्या रुग्णालयांकडून वसुलीदेखील करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
अशी आहे आकडेवारी
कोरोनावर उपचार करण्यात येणारी जिल्ह्यातील रुग्णालये
७१
जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेले ऑडिटर्स
१०२
बिल जास्त घेतलेल्या तक्रारींची संख्या
१५
१५ जणांना मिळाले पैसे परत
१९ रुग्णालयांनी आकारले होते जादा बिल
बीड जिल्ह्यात जवळपास ७१ खासगी रुग्णालयांत कोरोनावर उपचार केले जात होते. त्यापैकी १९ रुग्णालयांनी जास्तीचे बिल आकारल्याचे आतापर्यंत झालेल्या लेखापरीक्षणात उघड झाले आहे. अशा रुग्णालयांकडून १० लाख रुपये वसूल केले जाणार आहेत, तर प्रसासनाच्या लेखापरीक्षणात रुग्णालयांनी बिल दिल्यानंतर रुग्णांना दिलेली सूट ही जवळपास ९१ लाख ५० हजार ३३२ इतकी आहे.
ज्या खासगी रुग्णालयात शासनाच्या नियमानुसार बिल आकारले नसेल, तर त्यांना जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करता येणार आहे. त्यानुसार लेखापरीक्षण करून संबंधित रुग्णालयाने जास्तीचे बिल आकारल्याचे समोर आले तर, ती रक्कम परत केली जाणार आहे. त्यामुळे काही शंका आल्यास रुग्णालयासंदर्भात तक्रार करता येऊ शकते.
सर्वच रुग्णालयांच्या देयकांचे होणार ऑडिट
कोरोना संकटात रुग्णांना उपचार मिळवण्यासाठी खासगी रुग्णालयांनाही कोरोनावर उपचार करण्यासाठी परवानगी दिली होती. रुग्णालयाच्या संदर्भात जादा बिलाच्या तक्रारीनंतर सर्वच रुग्णांना तात्काळ परत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. काही रुग्णांना ही रक्कम परत मिळाली आहे, तर लेखापरीक्षणानंतर सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.
रवींद्र जगताप, जिल्हाधिकारी, बीड