बीड : शहरातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (एआरटीओ) विविध कामांसाठी येणा-या सर्वसामान्य व्यक्तींना कार्यालयातील अधिकारी, कर्मचा-यांकडून अरेरावी करून दलालांना खुर्चीवर बसवून पाहुणचार केला जात असल्याचे धक्कादायक वास्तव बुधवारी समोर आले आहे. यामुळे कार्यालयाची प्रतिमा मलीन होत असून लोकप्रतिनिधींसह वरिष्ठांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने सर्वसामान्यांची लूट राजरोसपणे खुलेआम सुरू आहे.
येथील उपप्रादेशिक कार्यालयात सध्या मनमानी कारभार सुरू आहे. अगोदरच येथील कारभार प्रभारींवर आहे. तर उपलब्ध अधिकारी, कर्मचा-यांवर वरिष्ठांचा वचक नसल्याने कामे खोळंबली आहेत. तसेच सर्वसामान्यांचे एकदा कार्यालयात येऊन कधीच काम होत नाही. कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. असे करूनही कामे करण्यास अधिकारी, कर्मचा-यांकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. विशेष म्हणजे कार्यालयातील एकही काम सर्वसामान्य व्यक्तीला करणे अवघड झाले आहे.
प्रत्येकवेळेस येथील अधिकारी, कर्मचारी दलालांकडे बोट दाखवून कामे करून घेण्याचा मार्ग दाखवितात. हाच फायदा घेत दलालांकडून सर्वसामान्यांची आर्थिक लूट होत आहे. यामुळे सर्वसामान्य व्यक्तींमध्ये कार्यालयाची प्रतीमा मलीन होत चालली आहे. शिवाय कार्यालयात येऊन कामे करून घेण्यास दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे. सर्वसामान्यांचे दुर्लक्ष होण्यास येथील अधिकारी, कर्मचारीच जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे. वेळीच यावर वरिष्ठांनी लक्ष घालून सर्वसामान्यांची लूट थांबवावी, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरु लागली आहे. प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी एस. नखाते यांनी भ्रमणध्वणी न घेतल्याने बाजू समजू शकली नाही.
दुजाभाव : असा चालतो कारभारसमोरच्या दरवाजाला कुलूप असते. एखाद्या प्रमाणपत्रावर अथवा इतर महत्वाच्या कागदपत्रांची माहिती अथवा स्वाक्षरी घ्यायची असेल तर मागच्या खिडकीतून बोलविले जाते. येथे तासनतास उन्हामध्ये ताटकळत उभे केले जाते. मनमानी कारभार चालवून कामे करण्यास हालगर्जीपणा केला जातो. तर दुस-या बाजूला दलाल हा फोनवरून संपर्क करून किंवा दरवाजा वाजवित कार्यालयातील अधिकारी, कर्मचा-याला जागे करीत आत प्रवेश करतो. आलेल्या दलालाला बसण्यासाठी खुर्ची देऊन कागदपत्रांचे तात्काळ काम पूर्ण करून त्याला वाट मोकळी करून दिली जाते. बाहेर मात्र सर्वसामान्यांना अरेरावी करीत तासनतास ताटकळत ठेवले जाते.
कार्यालयात प्रभारीराजयेथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ए.ए.खान यांची बदली झाल्यानंतर हे पद रिक्त झाले. त्यानंतर या कार्यालयाचा पदभार औरंगाबाद उपप्रादेशिक परिवहन अधिका-यांकडे सोपविण्यात आला. सवडीनुसार येऊन ते कारभार पाहतात. अधिकारी, कर्मचाºयांवर त्यांचा वचक राहिला नाही. प्रभारी अधिकारी असल्याचा फायदा घेत सर्वसामान्यांची सर्रास लूट सुरू असून, संताप व्यक्त होत आहे.
पुन्हा कारवाईची अपेक्षा...तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांनी अचानक कार्यालयाला भेट दिली होती. त्यांना येथील कारभार लक्षात येताच त्यांनी येथील दलालांची हकालपट्टी केली. परंतु अवघ्या काही दिवसात पुन्हा त्यांचे बस्तान बसले. आता पुन्हा त्याप्रमाणे कारवाईची गरज आहे. अन्यथा ही लूट दिवसेंदिवस सुरूच राहिल. या दलालांची हकालपट्टी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.