लोकमत न्यूज नेटवर्कबीड : भारतीय प्रशासकीय सेवेत नेहमी परराज्यातील युवक पुढे असतात हे चित्र सर्वत्र पहायला मिळते. आता महाराष्ट्रही मागे राहणार नसल्याचे दिसत आहे. भारतीय प्रशासकीय सेवेत ‘आम्ही नाही कमी’ हे दाखवून देत मराठी युवकांचा परराज्यात डंका राहणार आहे. केंद्र शासनाने ३ डिसेंबर रोजी राज्य केडर २०१८ जाहीर केले. यामध्ये बीडचा मयूर काथवटे याला बिहार राज्यात जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती मिळणार आहे.लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशभरातील १८० युवक, युवतींनी भरघोस यश मिळविले आहे. यातील १८ जण महाराष्ट्रातील आहेत. मसूरी (उत्तरांचल) येथील लालबहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमीमध्ये प्रशिक्षण सुरु असून त्यानंतर महाराष्ट्रातील १६ युवक, युवतींना परराज्यात तर दोघांना महाराष्ट्रातच थेट जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती मिळणार आहे.बीड जिल्ह्यातील मयुर अशोक काथवटे (२०१७ केडर रँक ९६) याची बिहारमध्ये जिल्हाधिकारीपदी नियुक्ती होणार आहे. आदित्य हिराणी, रोहन जोशी, श्रीनिवास पाटील, पीयूष साळुंके यांना प्रशिक्षणानंतर पश्चिम बंगालमध्ये नियुक्ती मिळणार आहे. कर्नाटकमध्ये गिरीष बडोले, दिग्विजय बोडके यांना तर ओडिसा मध्ये भुवनेश पाटील, मयुर सूर्यवंशी यांची नियुक्ती होणार आहे. आंध्र प्रदेशात श्रीनिवास अजयकुमार, सूरज गणोरे, तेलंगणामध्ये हेमंत बोरखेडे, तेजस पवार, पंजाबमध्ये विराग तिडके, आसाम-मेघालयमध्ये राहुल जावीर, गुजरातमध्ये स्नेहल भापकर या महाराष्ट्रातील आयएएस युवक युवतींची प्रशिक्षणानंतर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती होणार आहे. तसेच रोहन घुगे व आशिष येरेकर यांना महाराष्ट्रातच नियुक्ती मिळणार आहे.यूपीएससी, आयएएस केडरमध्ये परराज्यातील युवकांचे प्रमाण महाराष्ट्रात कमी होत आहे. महाराष्ट्रातील युवक, युवती देशभरात भारतीय प्रशासन सेवा-आयएसएस व इतर सेवांमध्ये जात आहेत ही अभिमानाची बाब आहे. हे प्रमाण अजून वाढावे अशी अपेक्षा या क्षेत्रातील अभ्यासक प्रा.एस.जी.राऊत यांनी व्यक्त केली.
बीडचा मयूर काथवटे बिहारमध्ये होणार कलेक्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2018 12:46 AM